Sanjay Jagtap : पुणे जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा बसला आहे, पुरंदर हवेलीचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वत:जगताप यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. जगताप यांनी आज सासवडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपसोबत आम्ही बिना हुंड्याचं लग्न केलं आहे. यामध्ये माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसल्याची प्रतिक्रिया संजय जगताप यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले संजय जगताप?
भाजपसोबत आम्ही बिना हुंड्याचं लग्न केलं आहे. माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही अशी प्रतिक्रिया संजय जगताप यांनी दिली आहे. पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तत्पूर्वी संजय जगताप यांनी सासवडमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांनी विधानसभेचा प्रचार केला नाही. संजय जगताप यांच्या पराभवांमध्ये मोठा वाटा हा आघाडीचा आहे यावरती प्रश्न विचारला असता, जगताप म्हणाले की, आघाडीने कायमच आम्हाला डोक्यावरती आपटले आहे. तसेच काँग्रेसला देखील त्यांनी संघटनात्मक शिस्त लावण्याचा सल्ला दिलेला आहे.
संजय जगतापांचा भाजप प्रवेश हा काँग्रेस पक्षासाठी मोठा हादरा
दरम्यान, संजय जगताप यांचे निकटवर्तीय आणि भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर पुरंदर-हवेली परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही सत्तेच्या जवळ जाण्याची चळवळ सुरू झाली आहे. "सत्तेशिवाय शहाणपण नाही," या भूमिकेतून अनेक कार्यकर्त्यांनी संजय जगताप यांना भाजपमध्ये जाण्याचा आग्रह धरला आहे. जगताप यांचे संघटनक्षमता, विविध सामाजिक संस्थांमधील प्रभाव, आणि तरुण कार्यकर्त्यांची फळी पाहता, भाजपसाठी ते फायदेशीर ठरू शकतात. भाजपच्या प्रदेश नेत्यांकडूनही त्यांच्या प्रवेशासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. संजय जगतापांचा भाजप प्रवेश हा काँग्रेस पक्षासाठी मोठा हादरा मानला जात आहे.
संजय जगताप यांचे आरएसएस कार्यकर्त्यांशी पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. यामुळे त्यांच्या प्रवेशाला संघाचा विरोध असण्याची शक्यता कमी आहे. काही महिन्यांपूर्वी हे संबंध निवडणुकीच्या कारणाने तणावात आले असले, तरी आता नव्या समीकरणांतून ते पुन्हा सुसंगत होण्याची शक्यता आहे. आगामी काळात संजय जगताप कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पुरंदर मतदारसंघातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलू शकतात.