बुलढाणा  :  आपल्या बेताल वक्तव्यांनी  महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर चिखल उडवणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांची (Sanjay Gaikwad)  जीभ  पुन्हा एकदा घसरली आहे.   राहुल गांधींची (Rahul Gandhi)  जीभ छाटण्याची भाषा करणारे संजय गायकवाड आता काँग्रेसच्या नेत्यांना गाडण्याची भाषा करत आहेत. 19 सप्टेंबरला  मुख्यमंत्री शिंदे बुलढाण्यात येणार, काँग्रेसमधल्या कोणीही त्यांच्या कार्यक्रमात अडथळा आणला तर तिथेच गाडून टाकीन, असा इशारा संजय गायकवाडांनी दिला आहे. 


संजय गायकवाड म्हणाले,  19 सप्टेंबरला मुख्यमंत्री बुलढाणा येथे येत आहेत. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम  होणाार आहे.  जो गोरगरीब, शेतकरी, मोलमजूर महिलांचा कार्यक्रम आहे. माझ्या कार्यक्रमात जर कुणी काँग्रेसच्या कुत्र्याने त्यांच्या कार्यक्रमात अडथळा  आणला तर त्याला तिथेच गाडून टाकीन. त्यांनी फक्त आमच्या रोडवर पाय ठेऊन दाखवावा.  जर पाय ठेवला तर तुम्हाला कळेल शिवसेना काय आहे.


राहुल गांधीवर केलेल्या वक्तव्यावर मी ठाम : संजय गायकवाड


 मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी या काँग्रेसच्या मागणीवर  बोलताना संजय गायकवाड म्हणाले,  राहुल गांधीविषयी केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे. मी केलेले वक्तव्य हे माझं वैयक्तिक वक्तव्य आहे.  मी वक्तव्य केले मी माफी मागत नाही तर माझे  मुख्यमंत्री का माफी मागतील. 


मी गुन्ह्याची परवा करत नाही : संजय गायकवाड


 विजय वडेट्टीवार यांचा आम्ही आदर करतो, त्यांनी त्यांच्या नेत्याला शिकवावं. आम्हा गोरगगरीबांचे आरक्षण हिसकवण्याची भाषा करतात. पहिले आपल्या नेत्याला शिकवा आणि मग आमचा निषेध करा. मी गुन्ह्याची परवा करत नाही. जर 70 कोटी जनतेचे आरक्षण वाचविण्यासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तर मी ते स्वीकारायला तयार आहे, असेही संजय गायकवाड म्हणाले.  


काय म्हणाले संजय गायकवाड?


बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार आहे. राहुल गांधी यांना मागासवर्गीय, आदिवासींसह इतरांचे शंभर टक्के  आरक्षण संपवायचं आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आलं आहे. राहुल गांधी हे जे शब्द बोलले की, आम्हाला आरक्षण संपवायचंय. माझं आवाहन आहे की, जो राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस मी माझ्या वतीनं देईल. 


 विदर्भाच्या बुलढाण्याचे  आमदार असणाऱ्या  संजय गायकवाडांची  बेताल वक्तव्ये करणे अशी ओळख राहिलीय. एकत्रित शिवसेनेत उद्धव ठाकरे मुख्यंमत्री असताना देवेंद्र फडणवीसांपासून विदर्भातील सगळ्याच भाजप नेत्यांना टार्गेट करण्यात गायकवाड आघाडीवर होते. मग शिंदेंचं सरकार स्थापन झाले. गायकवाड शिंदेंकडे आले. तेव्हापासून संजय गायकवंडांनी ठाकरेंना टार्गेट करण्यात बाजी मारलीय आणि आता थेट राहुल गांधींविरोधातलं त्यांचं  वक्तव्य आज पुन्हा चर्चेत आले आहे.