मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता भारत अभियानाला प्रतिसाद देत महाराष्ट्रात गड-किल्ले स्वच्छता अभियानाला प्रांरभ करण्यात आला आहे. हे स्वच्छता अभियान 15 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील 100 किल्ल्यांवर होणार आहे. मुंबईतील शिवडी,सेंट जॉर्ज किल्ल्याच्या स्वच्छता मोहिमेला 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रारंभ होणार आहे.

मुंबई, ठाणे, पुणे,कोल्हापूर,रत्नागिरी,रायगड, नागपूर, चंद्रपूर,गडचिरोली,औरंगाबाद, नांदेड, नाशिक,जळगाव, धुळे,अहमदनगर या जिल्ह्यातील सुमारे 100 किल्ल्यांवर ही स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. राज्य पुरातत्व विभाग, क्रेंद्रीय पुरातत्व विभाग, गडसंवर्धन समिती आणि गडसंवर्धन निगडीत स्वयंसेवी संस्था यांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग राहणार आहेत.

गड-किल्ल्यांच्या भागातील संबंधित पालकमंत्री, खासदार, आमदार , महानगरपालिका, नगरपालिका, गडप्रेमी संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, समाजसेवी संस्था यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.

पावसामुळे गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहिमेला अडथळा आल्यास त्या गडांवरील स्वच्छता मोहिम पुढे घेण्यात येणार आहे. आज औरंगाबाद मधील दौलताबाद, नागपूर मधील नगरधन या किल्ल्यांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली, या मोहिमेला भरघोस प्रतिसाद मिळाला.