मुंबई : मराठा आरक्षणासाठीचा लढा सुरू असून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत गेल्या 4 दिवसांपासून त्यांचे आमरण उपोषण सुरू असून मराठ आंदोलक संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे जरांगेंचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे वडगोद्री येते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनीही उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे, जालना जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, पुण्यातून मराठा (Maratha) आंदोलक आज मुंबईत (mumbai) पोहोचले असून आज रात्री आझाद मैदानावर ते ठिय्या करणार आहेत.   


पुण्यातून निघालेले मराठा आंदोलक आता मुंबईत दाखल झाले असून या आदोलकांच्या अवतीभोवती चेंबूर पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसून येत आहे. पुण्यातील मराठा आंदोलकांनी मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी आज ते आरक्षणाची मागणी मान्य करावी, असे म्हणत मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा आरक्षण मुख्यमंत्री स्मरण यात्रा असं या आंदोलनाला नाव देण्यात आलं आहे. रात्री 9 वाजता चेंबूरमधील शिवरायांच्या पुतळ्यासमोर आंदोलकांनी घोषणाबाजी करत राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी, मनोज जरांगे यांच्यासह मराठाआरक्षणासाठी त्यांनी घोषणाबाजी केली. 


सकल मराठा समाज पुण्याच्या वतीने स्मरण यात्रा काढून मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पुण्यातील कार्यकर्ते मंत्रालयाकडे निघाले आहेत. मनोज जरंगे गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत असताना सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केलाय. आज सकाळी हे कार्यकर्ते पुण्यातल्या खंडोबा चौकातून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. मराठा आक्षणासाची मागणी सरकारने पूर्ण करावी आणि मनोज जरांगेंच्या मागण्याकडे गांभीर्याने पाहावे आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन याबाबत स्मरण करून देण्यास ही यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा मुंबईच्या प्रवेशद्वार चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाली असून इथे मोठा पोलिस बंदोबस्तात ही यात्रा पुढे निघाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आमची तत्काळ भेट घ्यावी, अशी मागणी या मराठ्यांची आहे. 


जालन्यात मराठा-ओबीसी संघर्ष


जालना जिल्ह्यातील वडिगोद्री येथे ओबीसी आंदोलकांनी रस्ता रोको केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलकांकडून रास्ता रोको केला जातोय. पोलीस आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, संतप्त आंदोलकांकडून पोलिसांशी हुज्जत देखील घातली जात आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी काल रात्रीपासूनच अंतरवाली सराटीजवळ चोख बंदोबस्त ठेवला. 


बंडू जाधव यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट


जालना, परभणीचे खासदार बंडु जाधव यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे बंडू जाधव यांनी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची देखील विचारपूस करून काळजी घेण्याचा देखील आवाहन केलआहे.आम्ही जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ त्यांच्या सोबत आहोत,आम्ही पक्षाच्या नेत्यांना या संदर्भात कल्पना दिली आहे. हा विषय गंभीर असून जिव्हाळ्याचा आणि समाजाच्या हिताचा आहे. त्यामुळे आपण जरांगे यांच्या भूमिकेची सहमत असाव अशा प्रकारची मागणी आम्ही पक्षाकडे केली आहे. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाचे परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी दिलीय.