सांगली : शेतात औषध फवारणी करताना विजेच्या तुटलेल्या तारेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याला वाचवताना आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. सांगलीत मिरज तालुक्यातील कावजी खोतवाडीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.


25 वर्षांच्या अभिजीत रामचंद्र पाटीलला या घटनेत प्राण गमवावे लागले आहेत. तर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात 52 वर्षीय रामचंद्र विष्णू पाटील आणि 45 वर्षांच्या राजश्री पाटील हे त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

पाटील कुटुंबाच्या शेतातून विद्युत वाहिनी गेली आहे. खोतवाडी परिसरात मंगळवारी रात्री सुसाट वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. पाऊस आणि वाऱ्यामुळे विजेची तार तुटली होती.

अभिजीत बुधवारी सकाळी ऊसावर औषध फवारणीसाठी शेतात गेला होता. औषध फवारणी करताना त्याचा पाय विजेच्या तारेवर पडला. विजेच्या जोरदार धक्क्याने तो खाली कोसळला.

ते पाहून त्याची आई राजश्री धावली. लेकाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनाही विजेचा धक्का बसला आणि त्या बाजूला फेकल्या गेल्या. मायलेक शेतात पडल्याचं पाहून वडील रामचंद्रही त्यांना वाचवण्यासाठी धावले, मात्र त्यांनाही धक्का बसला.