Sangli: राज्यात जोरदार पाऊस झाल्याने धरण साठ्यांमधून नदीपात्रात विसर्ग होत असताना आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वारणा नदी पात्रातील एका झाडावर व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली असता विशेष रेस्क्यू फोर्स आणि ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन झाडावर अडकलेला मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढलाय. 


मृत व्यक्तीची ओळख पटली असून भास्कर अंकुश वासुदेव (वय 47) असे या व्यक्तीचे नाव आहे. मागील काही दिवसांमध्ये वारणा नदीला पुराचा वेढा असल्याने नदीतले पाणी पात्र बाहेर आले होते. या पाण्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पुराच्या पाण्यात वाहत जात झाडांमध्ये अडकला असावा असा अंदाज आहे. 


नदीपात्रावरील झाडावर आढळला मृतदेह 


वारणा नदीपात्रातील एका झाडावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. नदीची पाणी पातळी कमी झाल्याने पात्रातील झाडावर अडकलेला मृतदेह गावकऱ्यांना दिसला. मृतदेह दिसल्याने गावात खळबळ उडाली असून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत खबर देण्यात आली. 


सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवठेपिरान दुधगाव गावातील पांजरपोळ नदीपात्रात  ही घटना घडली. शेजारील काठावरील पंचवीस फूट झाडावरती या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच विशेष रेस्क्यू फोर्स आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. यानंतर झाडावर अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. 


वारणा नदीच्या पुरात वाहत येऊन झाडात अडकल्याचा अंदाज 


मागील काही दिवसांपूर्वी सांगलीत झालेल्या जोरदार पावसामुळे वारणा नदीला पूर आला होता. नदी नाले ओसंडून वाहत असल्याने वारणा नदीची पाणीपातळी कमालीची वाढली होती. या पुरात अज्ञात व्यक्ती वाहून गेल्याचेही कळाले होते. पुराच्या पाण्यात या व्यक्तीचा मृतदेह वाहत येऊन तो झाडामध्ये अडकला असावा असा अंदाज लावला जात आहे. याचा पुढील तपास सुरू आहे.