सांगली: जातीधर्माच्या पलीकडे जाऊन मृत व्यक्तींच्या अंत्यविधी कार्यात सक्रिय योगदान देणाऱ्या वाळवा तालुक्यातील 94 गावातील 452 वैकुंठस्नेहींच्या कामाचा गौरव आणि त्यांचा सत्कार सर्जेराव यादव प्रतिष्ठान तर्फे करण्यात आला. या कृतज्ञता सोहळ्यास प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, इंद्रजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी या वैकुंठस्नेहींना सन्मानपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या. इस्लामपूरमधील सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
मृत्यू प्रसंगी प्रत्यक्ष दहन, दफन, रक्षाविसर्जन, दहावा, उत्तर कार्य या सर्व कार्यक्रमांवेळी वैकुंठस्नेही मृत व्यक्तीच्या कुटुंबाचा आधार बनून राहतात. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होत. दुःख हलके करण्याचा या मंडळींचा प्रयत्न स्तूत्य पथदर्शक व अभिनंदनास पात्र आहे.
धर्म, जात यापलीकडे जाऊन मृत व्यक्तींच्या अंत्यविधी कार्यात सक्रिय योगदान देणाऱ्या वैकुंठस्नेहीच्या कामाचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कोरोना काळात तर या लोकांनी आपला जीव धोक्यात घालून मयताची अंत्यसंस्कार प्रक्रिया पार पाडली. या लोकांचे हेच काम पाहून या वैकुंठस्नेहीचा सत्कार आणि त्यांच्या कामाचा गौरव करण्याचा निश्चय इस्लामपूर मधील सर्जेराव यादव प्रतिष्ठानने हाती घेतला आहे. वाळवा तालुक्यांतील 94 गांवातील 452 वैंकुंटस्नेहींचा सत्कार सोहळा सर्जेराव यादव प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आला होता. सर्व समाजात वैंकुंठस्नेही हीच मंडळी सर्वात श्रीमंत आहेत असं मानलं गेलंय. कारण कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या मृत देहाची शारिरीक परिस्थिती चांगली किंवा वाईट स्थितीत असू असते.
वैंकुठस्नेही हे मृत व्यक्तीची शारिरीक परिस्थिती कशीही असली तरी त्याचा ते विचार करत नाहीत किंवा त्यांना त्याची घाण वाटत नाही. जसे असेल तश्या परिस्थितीतही हि सर्व मंडळी पिडीत कुटुंबाला आधार देणे, तिरडी बांधने, दहन देणे, रक्षाविसर्जनच्या वेळी पुढे होऊन ग्राऊंड लेव्हलची सर्व कामे सामाजिक बांधीलकी आणि आपुलकीच्या नात्याने करतात व उत्तरकार्य होईपर्यंत त्या दुःखी कुटुंबासोबत ही सर्व मंडळी असतात. अशा लोकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते व्हावा म्हणून हा सत्कार सोहळा आयोजित केला गेला होता. ही एक भविष्यातल्या सर्वांसाठी चळवळ असेल असा मनोदय यावेळी सर्जेराव यादव यांनी बोलून दाखवला. आजपर्यंत कोणी अशा वैंकुठस्नेहींचा सत्कार केलेला पाहिला नाही किंवा ऐकले नाही. वैंकुंठस्नेहींचा सन्मानपत्र देवून सत्कार व्हायला हवा ज्यामुळे पुढील काळात अशा उपक्रमांत जास्त लोक सामील होतील व सत्कार सोहळ्यामुळे तरूणांईसमोर एक चांगला संदेशाही जाईल असा विश्वास सर्जेराव यादव प्रतिष्ठानचे संस्थापक उद्योजक सर्जेराव यांना आहे. या सर्व वैंकुंठस्नेहीचा सत्कार करण्याबरोबरच 450 लकी ड्रॅा पद्धतीने प्रत्येकाला भेटवस्तूं देखील यावेळी दिल्या गेल्या.