सांगली : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असून सत्तापेच अद्याप सुटलेला नाही. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. "शेतकऱ्यांनी अजिबात घाबरुन जाऊ नये. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून लवकरच नुकसान भरपाई मिळेल," असा विश्वास शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. सांगली जिल्ह्यातील कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणी दौऱ्यावेळी ते बोलत होते. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, उद्धव ठाकरेंसोबत या दौऱ्यात काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदमही सहभागी झाले होते.

परतीच्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं सावट पसरले आहे. उन्हाळ्यातील दुष्काळ, त्यानंतर आलेला महापूर आणि पूर ओसरल्यानंतर परतीच्या पावसामुळे उद्भवलेली अतिवृष्टी यामुळे यंदाच्या वर्षी सांगली जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्याने जिल्ह्यातील द्राक्षबागांना याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे आज उद्धव ठाकरे यांनी सातारा-सांगली जिल्ह्यातील शेतीची थेट बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांकडून नुकसानीच आढावा घेत त्यांच्याशी संवादही साधला. त्यांनी कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील टोमॅटो, द्राक्ष आणि डाळिंब बागांचीही पाहणी केली.

पाहणी दौऱ्यादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीने विटा येथे उभारण्यात आलेल्या शेतकरी मदत केंद्राला भेट देत शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन, त्या माझ्याकडे लेखी स्वरुपात पाठवा अशा सूचना देखील शेतकरी मदत केंद्राच्या प्रमुखांना दिल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विदर्भाच्या पाहणी दौऱ्यावर गेले होते. यावेळी शरद पवार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आणि त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. सरकारकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.