सांगलीत क्रूझरच्या अपघातात पाच पैलवानांसह 6 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 13 Jan 2018 07:42 AM (IST)
सांगलीतील कडेगाव तालुक्यातील वांगी गावात घडलेल्या भयंकर अपघातात सहा पैलवानांना प्राण गमवावे लागले.
सांगली : सांगलीतील वांगीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच पैलवानांसह गाडीचालकाचा मृत्यू झाला आहे, तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. साताऱ्यातून कुस्ती खेळून परतताना हा अपघात घडला. सांगलीतील कडेगाव तालुक्यातील वांगी गावात हा भयंकर अपघात घडला. शुक्रवारी रात्री एक वाजताच्या सुमारास सांगलीतील कुंडल गावातल्या क्रांती कुस्ती संकुलाचे काही पैलवान प्रवास करत होते. साताऱ्यातील औंधमध्ये कुस्ती खेळून ते क्रूझरने परतत होते. शिरगाव फाट्याजवळ ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि क्रूझर यांची धडक होऊन भीषण अपघात झाला. घटना मध्यरात्री घडल्याने काही वेळाने अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर चिंचणी वांगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. या अपघातात पाच पैलवान आणि क्रूझर चालकाला प्राण गमवावे लागले, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पैलवान आकाश देसाई, पैलवान विजय पाटील, पैलवान सौरभ माने, पैलवान शुभम घारगे यांचा मृत्यू झाला.