सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांत फ्री स्टाईल हाणामारी झाली. सत्ताधारी गटाचे संचालक शशिकांत बजबळे यांना व्यासपीठावर खाली पाडून मारहाण करण्यात आली. तर मारहाण करणाऱ्या गुरुजीला सत्ताधाऱ्यांनी प्रसाद दिला. शिक्षकांनी अक्षरशः एकमेकांच्या उरावर बसून बेदम मारामारी केली. या अभूतपूर्व गोंधळातच सत्ताधाऱ्यांनी सर्व विषय मंजूर करत पाच मिनिटातच सभा गुंडाळली.

प्राथमिक शिक्षक बँकेची 66 वी सर्वसाधारण सभा दीनानाथ नाट्यगृहात पार पडली. सुरुवातीपासूनच सभेत तणावाची स्थिती होती. सत्ताधारी शिक्षक समितीने सभागृहात पहिल्या रांगेतील खुर्च्यावर कब्जा केला होता. त्यात व्यासपीठासमोरील मोकळ्या जागेत जाण्यासाठीचा मार्गही खुर्च्या टाकून अडवला होता. यावरुन सभेच्या सुरुवातीलाच विरोधी शिक्षक संघ थोरात गटाच्या समर्थकांनी दंगा करण्यास सुरुवात केली.

बँकेचे व्यवस्थापक बाळासाहेब कोले यांनी अहवाल वाचनाला सुरुवात केली. विरोधी संचालक विनायक शिंदे यांनी व्यासपीठसमोर येत अजेंड्यावरील जागा आणि इमारत खरेदीचा विषय क्रमांक 9 रद्द करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. शिंदे समोर येताच सत्ताधारी गटाचे संचालकही त्यांच्या दिशेने धावले. याचवेळी खालून एक सभासद व्यासपीठावर धावून आला. तो संचालक बजबळे यांच्या अंगावर धावून गेला. दोघांत झटापट झाली. यात दोघेही खाली पडले. दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. तोपर्यंत इतर संचालकही मदतीला धावले. त्यांनी बजबळे यांना बाजूला काढून त्या शिक्षकाला चोपले.

सभागृहातील वातावरण तापलं असतानाच कोणीतरी सभागृहातील लाईट घालवल्यामुळे पुन्हा जोरदार राडा झाला. सभागृहातील खुर्च्यांचीही तोडफोड करण्यात आली.

या प्रकाराने सभागृहात अभूतपूर्व गोंधळ उडाला. बंदोबस्तांसाठी केवळ दोनच पोलिस सभागृहात असल्याने शिक्षकांच्या गोंधळ रोखण्यात तेही हतबल ठरले. मारहाण करणाऱ्या शिक्षकाला व्यासपीठावरुन अक्षरश: ढकलत खाली काढण्यात आले. याच गोंधळात अध्यक्ष रमेश पाटील यांनी अजेंड्यावरील विषय वाचण्यास सुरुवात केली. अवघ्या दोन मिनिटात त्यांनी अजेंड्यावरील 13 विषय वाचले आणि सभा संपल्याचे जाहीर करून काढता पाय घेतला.

सभेत गोंधळ घालणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचं शिक्षक बँकेच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे. तर फेरसभा घेण्यात यावी अशी मागणी विरोधी शिक्षक गटाने केली आहे.