मिरज बलात्कार प्रकरण : आरोपी अमित कुरणे अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2016 06:48 AM (IST)
सांगली : मिरजमधील बलात्कार पीडित तरुणीच्या आत्महत्येनंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपी अमित कुरणेसह त्याच्या आई-वडिलांनाही ताब्यात घेतलं आहे. अमित कुरणेविरोधात पीडितेनं बलात्काराची तक्रार दिली होती. अमित कुरणेविरोधात तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. उलट तक्रारीनंतर पीडित महिलेवरच पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. या सर्वाला कंटाळून काल पीडितेनं थेट आरोपी अमित कुरणेच्या घरातच स्वतःला गळफास लावून घेतला आणि मृत्यूपर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीत आपण अमितमुळे आत्महत्या करत असल्याचं लिहून ठेवलं. घटना काय आहे? बलात्कार पीडित तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे. आरोपीच्या शेतातील घरात गळफास घेऊन पीडितेने आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी पीडितेने चिठ्ठी लिहिली आहे. त्याचप्रमाणे भिंतीवरही आरोपीचं नाव लिहिलं आहे. आरोपीवर कारवाई होत नसल्याच्या विवंचनेतून पीडित महिलेने आत्महत्या केली. आरोपीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरुन पीडित महिलेवर पोलिसांनी काल खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. या त्रासाला कंटाळूनच तिने आयुष्य संपवलं.