अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काळ्या पैशांविरुद्ध पुन्हा रणशिंग फुंकलं आहे. राजकीय पक्ष, अधिकारी आणि माफियांच्या युतीतून काळा पैसा येतो. त्यामुळे काळ्या पैशाच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी जनसंसद मजबूत करण्याचं आवाहन अण्णांनी केलं आहे.


 

संविधान मोर्चा आणि भारतीय जनसंसद जनजागृती अभियनात ते बोलत होते. माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत, विजय पांढरे, अशोक सब्बन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थित जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली. लवकरच काळ्या पैशाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येणार आहे.

 

काळा पैसा देशाच्या विकासातील मोठा अडसर आहे. त्यामुळे जनआंदोलनासाठी संघटन उभारण्याची गरज अण्णांनी व्यक्त केली. त्याचबरोबर काळा पैसा रोखण्यासाठी हजाराच्या आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद कराव्यात आणि नागरिकांना एक लाखापेक्षा जास्त  रक्कम जवळ बाळगण्यास मनाईची मागणी अण्णांनी केली. त्याचबरोबर केवळ बँकिंग व्यवहारास प्राधान्य देण्याची मागणीही अण्णांनी केली आहे.