नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात कर्जमाफीच्या गोंधळावरुन सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या सूचना स्वतः अजित पवार यांनी दिल्या होत्या. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्याच अभिनंदनाचा ठराव महापालिकेत एकमताने मंजूर करण्यात आला.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या युवराज बावडेकर यांनी कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी हा ठराव बिनविरोधपणे मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे काँग्रेसच्या महापौरांनी कर्जमाफीचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय अभिनंदनीय असल्याचं सांगत कौतुकही केलं.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा घुमजाव
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या प्रकारावर मात्र आता घुमजाव केला आहे. महासभेत काँग्रेसकडून घाईगडबडीत ठराव मांडण्यात आला आणि तो कुणाला समजण्याच्या आत मंजूर झाला. त्यामुळे आम्हाला या ठरावाला विरोध करता आला नाही, असा दावा राष्ट्रवादीच्या सभापती संगीता हारगे यांनी केला आहे. या ठरावाला राष्ट्रवादीचा विरोध असल्याचं उशीराचं शहानपणही राष्ट्रवादीला सुचलं आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत राज्यभरात संघर्षयात्रा काढली. कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही निकषांवरुन राष्ट्रवादीने सरकारवर टीकेचे बाण सुरुच ठेवले. पण दुसरीकडे राष्ट्रवादीचेच नगरसेवक कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनही करत आहेत.