सांगली : मुंबईत मृत्यू झालेल्या सांगलीतील व्यक्तीच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी या मूळगावी अंत्यसंस्कार झाले होते. त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या 30 जणांना इन्स्टिट्यूटशनल क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. कडेगावच्या तहसीलदार शैलजा पाटील यांनी ही माहिती दिली.


35 वर्षीय मृत व्यक्ती मुंबईतील सायनमध्ये रिक्षा चालक म्हणून काम करत होता. हृदयरोगाच्या त्रासामुळे त्याला 15 एप्रिल रोजी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मागील आठवड्यात गुरुवारी रात्री त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तो मूळचा सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातील असल्याचं समोर आलं. त्यानंतर खेराडे वांगी या मूळगावी मृतदेह पाठवून 19 एप्रिल रोजी पहाटे त्याच्या अंत्यसंस्कार करण्यात आले होते.


गलीकरांनी करुन दाखवलं! जिल्ह्यातील शेवटचा रुग्णही कोरोनामुक्त



त्याच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाने त्याचा स्वॅब घेतला होता. त्याचा अहवाल काल म्हणजेच 22 एप्रिलला मिळाला. त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. मुंबई महापालिका प्रशासनाने याची माहिती सांगली जिल्हा प्रशासनाला दिली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने खेराडे वांगी गावातील त्या व्यक्तीच्या अंत्यविधीला उपस्थित असणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांसह एकूण 30 जणांना प्रशासनाने इन्स्टिट्यूटशनल क्वॉरन्टाईन केलं आहे. सोबतच प्रशासनाने खेराडे वांगी गाव सील करत गावात येणारे सर्व रस्ते सील केले आहेत.


दरम्यान आरोग्य पथकाने अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या 21 जणांचे स्वॅब घेतले आहेत. मुंबई महापालिकेच्या माहितीनंतर वेगाने हालचाल करुन या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या सगळ्यांना इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईन केलं आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.


Sangli Corona Free | महिन्याभरात सांगली कोरोनामुक्त! सांगलीने कोरोनाला ब्रेक कसा लावला?