सांगली : सांगलीत एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरज शहरातील गांधी चौक परिसरात तानाजी रामचंद्र दंडगुले यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये दंडगुले गंभीर जखमी झाले आहेत.
मिरज शहरातील गांधी चौक येथील दारुच्या दुकानात दारु पिण्यासाठी तानाजी दंडगुले आले होते. त्यावेळी पाच ते सहा जणांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील अडीच हजार रुपयांची रोकड काढून घेतली.
दंडगुले यांनी विरोध करताच सहा आरोपींनी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि त्यांना पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.