सांगली : कोरोना संसर्गाचं चित्र अतिशय गंभीर वळणावर आलेलं असतानाच आता स्थानिक प्रशासन अधिकाधिक कठोर निर्णय घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियम लागू असतानाच आता सांगलीत हे निर्बंध आणखी कठोर केले जाणार आहे. खुद्द पालकमंत्री जयंत पाटील यांनीच जिल्ह्यात आठ दिवसांच्या सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 


जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात 5 मे रोजी मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा पाहता ही साखळी तोडण्यासाठीच हा निर्णय घेतला जात असल्याचं म्हणत त्यांनी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. 


'तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा', असे भावनिक आवाहनही जयंत पाटील यांनी नागरिकांना केले.


Coronavirus Lockdown in India : देशात पुन्हा लॉकडाऊन? टास्क फोर्सची केंद्र सरकारला शिफारस, सुत्रांची माहिती


दरम्यान पालकमंत्री जयंत पाटील हे 1 मे पासून सांगलीतच असून, परिस्थितीचा अतिशय जवळून आढावा घेत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, रुग्णसंख्या, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सर्व गोष्टींवर ते लक्ष ठेवून आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि अन्य भागात कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. या ठिकाणीही सलग दोन दिवस बैठक घेत कोरोना नियंत्रण आणण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशही जयंत पाटील यांनी दिले.