सांगली : सांगली महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी आपली उमेदवाराची यादी जाहीर केली आहे. अपेक्षेप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहेत, तर शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढणार आहेत.

78 पैकी 40 जागांवर काँग्रेस तर 29 जागांवर राष्ट्रवादी लढणार आहे. पाच ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असून चार जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार लढणार आहेत.

दुसरीकडे भाजप आणि शिवसेना मात्र ही निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहेत. भाजपने 78 पैकी 78 उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेनेने 78 पैकी 52 ठिकाणी उमेदवार दिले आहेत.

या निवडणुकीत प्रथमच आम आदमी पक्ष आणि सांगली सुधार समिती उतरत आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन 50 उमेदवार देणार आहेत. यापैकी 19 उमेदवार हे सांगली सुधार समितीच्या चिन्हावर लढणार आहेत.

पुढील आठवड्यात सर्वच पक्षांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षाचे वरिष्ठ नेते, स्टार प्रचारक सुद्धा निवडणूक काळात सांगली मिरजेत येणार आहेत. यामुळे सांगली महापालिकेची यंदाची निवडणूक अटीतटीची होणार आहे.