कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगलीत पूर परिस्थिती भीषण झाली असून अद्यापही हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. अनेक नागरिकांना वेळेवर मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर परिस्थितीचा आढावा घेतला. वाईट हवामानामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगलीचा दौरा रद्द केला. तर मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून कोल्हापुरातील पुराची पाहणी केली.


पूरपरिस्थितीची पाहणी करुन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच महापुरात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सैन्यदल, नौदल, कोस्टगार्ड, एनडीआरएफ आणि पोलिसांकडून पूरग्रस्तांची मदत सुरु आहे. त्याचबरोबर पंजाब, ओदिशा, गोवा, गुजरात या राज्यांमधून बचाव पथके बोलावण्यात आली आहेत. पुरात अडकलेल्या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एअरलिफ्टिंग करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकूण 60 बोटी सध्या कार्यरत आहेत.

सांगली शहर आणि परिसरात पुराची भीषण
सांगली शहर आणि परिसरात अजूनही पुराची स्थिती भीषण आहे. हजारो घरं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं मोठं आव्हान प्रशासनसमोर आहे. तीन दिवसांपासून सांगतील पूर असल्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत. पुरामुळे अद्यापही हजारो लोक घरात अडकून पडले आहेत. त्यांच्यापर्यंत मदतकार्य पोहोचत नाही. घरात वीज नाही, भाजीपाला किंवा दूध नाही. अशा स्थितीत जीव मुठीत घेऊन लोक जगत आहेत. तीन दिवसांपासून ही स्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराची पाहणी करणार आहेत.

सांगलीवाडीला पुराच्या पाण्यानं वेढा घातला
सांगलीत कृष्णा नदीच्या काठावरच असलेल्या सांगलीवाडीला पुराच्या पाण्यानं वेढा घातला आहे. गावात शेकडो लोक अडकल्याची शक्यता आहे. सांगली शहरातील राणा प्रताप चौक, कॉलेज कॉर्नर परिसरात कमरेएवढं पाणी साचलं आहे. शिवाय तिकडे भिलवडी आणि आजूबाजूची गावं पाण्यात अडकली आहेत. तिकडे जवळपास 300 ते 500 लोक अडकल्याची शक्यता आहे. NDRFच्या टीमला देखील मदतकार्यात अडचणी येत असल्याची माहिती मिळत आहे. बाभळीचे काटे आणि पाण्याखाली अडथळ्यांमुळे NDRFच्या बोटी पंक्चर होत आहेत. त्यामुळे पत्र्याच्या नेव्ही बोट्सची मागणी होत आहे.

व्हिडीओ पाहा

जिल्हा कारागृहात पाणी, 340 कैदी कारागृहात
सांगली शहराप्रमाणेच जिल्हा कारागृहात पाणी शिरलं आहे. त्यामुळे जवळपास 340 कैदी कारागृहात अडकले आहेत. कैद्यांना बाहेर काढण्यासाठी जेल प्रशासनानं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांकडे मागणी केली आहे. तर, सांगलीचं जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयालाही कृष्णेच्या पुरानं वेढा घातला आहे. जुनं जिल्हाधिकारी कार्यालय असलं तरी अजूनही तिथे काही सरकारी विभागांचं कामकाज चालतं.