कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात महापुराने थैमान घातलं आहे. बचावकार्यादरम्यान लहान मुलं आणि महिलांना प्राधान्य दिलं जात आहे. मात्र एका चिमुकलीने वडिलांना जोपर्यंत बाहेर काढत नाही, तोपर्यंत जाणार नाही असा हट्ट धरत टाहो फोडला. मुलीच्या अगतिकतेसमोर बचावकार्यातील जवानांना आणि तिथे असलेल्यांच्याही काळजाचं पाणी झालं.

कोल्हापुरातील आंबेवाडीतील शिवाजी पुलाजवळ आज सकाळी हा प्रकार घडला. इथे अडकलेल्या माय-लेकीला जवानांनी बाहेर काढलं. परंतु तिचे वडील पुराच्याच पाण्यातच होते. मात्र जोपर्यंत बाबांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढणार नाही, तोपर्यंत इथून जाणार नाही असं म्हणत मुलीने रडायला सुरुवात केली. तिने आपल्या इतर नातेवाईकांना इथून पुढे पाठवलं, परंतु तिने तिथून न हलण्याचा निर्णय घेतला.

यानंतर जवानांनीही वडिलांना सुरक्षित बाहेर काढू, पण तू इथून जा, असं सांगत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही ती तिच्या भूमिकेवर ठाम होती. अखेर काही वेळाने ती तिथून जाण्यास तयार झाली. एकीकडे पुराच्या पाण्यामध्ये कित्येक कुटुंबांचं विश्व उद्ध्वस्त झालं. अशावेळी आपल्या वडिलांसाठी हट्ट करणाऱ्या या चिमुकलीचा टाहो काळजाला हात घालणारा होता.