सांगली : जत तालुक्यातील काकासाहेब सावंत या शेतकऱ्यांने एकाच आंब्याच्या झाडावर 22 प्रकारच्या जातीचे आंबे घेण्याची किमया साधलीय. यामध्ये केशर, हापुस, सिंधू, रत्ना, सोनपरी, नीलम, निरंजन, आम्रपाली, क्रोटोन, तैवान, लालबाग, दशेरी, राजापुरी, बेनिश, पायरी, बारोमाशी, वनराज, मलगोबा, मल्लिक्का, तोतापुरी अशा देशी आणि काही विदेशी आंब्याच्या जाती समाविष्ट आहेत. एकाच झाडाला सावंत यांनी वेगवेगळ्या जातीची 44 कलम केली. यातील 22 जातीचे कलम लागू झाले आणि यंदा या एकाच झाडांच्या आंब्याला 22 प्रकारचे आंबे लगडले आहेत. यातील काही आंब्याचा तोडा झाला आहे. 22 जातीच्या मिळून जवळपास 700 आंबे लागले होते. काही जातीचे 4-4 डझन तर काही जातीचे 2-3 डझन आंबे लागलेत.
नोकरी सोडून नर्सरी व्यवसाय
पहिल्याच वर्षी या एकाच झाडावर 22 प्रकारच्या आंब्याचे जातीचे उत्पादन घेऊन सावंत यांनी आंबा शेतीत एक नवीन प्रयोग यशस्वी केलाय. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळग्रस्त भाग. याच तालुक्यातील अंतराळ गावचे काकासाहेब सावंत यांनी नोकरी सोडून गाव गाठले आणि शेती सुरू केली. नंतर शासनमान्य श्री बनशंकरी नावाने नर्सरी सुरू केली. या तालुक्यातील शेती निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे. असे असतानाही मोठ्या हिंमतीने काकासाहेब सावंतांनी नर्सरी सुरू केली. त्यांनी आयटीआयमधून डिप्लोमा केलेला आहे. काकासाहेबांना आपल्या निर्णयाबद्दल समाधान वाटते.
वर्षाकाठी 50 लाख रुपयांचे उत्पन्न
त्यांचे कुटुंब आज नर्सरीच्या व्यवसायात चांगलेच स्थिरावले आहे. पुण्यातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये एक दशक, काम केल्यानंतर काकासाहेब सावंत आता एक नर्सरी चालवतात. त्यातून त्यांना वर्षाकाठी 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. हे करत असताना सावंत यांनी 3 वर्षांच्या आंब्याच्या झाडावर एक प्रयोग केला. 22 प्रकारच्या आंब्याची लागवड सावंत यांनी केली. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात हा प्रयोग यशस्वी केला.
सावंतांनी त्यांची शेती आंब्याची लागवड आणि बिगर आंब्याची लागवड अशा दोन गटात विभागली आहे. केशर या आंब्याची जातीची लागवड जवळपास 10 एकरांत करण्यात आली आहे. तर उर्वरित 10 एकरांमध्ये चिकू, डाळिंब, सीताफळ, हळद इत्यादींची लागवड केली जाते. सावंतांनी सरकारच्या विविध योजनांमधून सबसिडीचा लाभ घेत नर्सरी सुरू केली आहे. अनेक वर्षे सातत्याने मेहनत घेत आणि आपल्या कामाचा पाठपुरावा करत त्यांनी यश मिळवले आहे. आता जत तालुक्यात आंब्याच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. यावर्षी मोठी ऑर्डर काकासाहेब यांना मिळाली आहे. प्रत्येक रोप 40 ते 70 रुपयांना विकले जाते.
दरवर्षी जवळफास 2 लाख आंब्याच्या रोपांची विक्री
सावंत दरवर्षी जवळफास 2 लाख आंब्याची रोपे विकतात. याव्यतिरिक्त ते एक लाख सीताफळे, जांभूळ, चिकू, लिंबू इत्यांदी फळांची रोपे विकतात. सावंतांच्या नर्सरीतून रोपे घेण्यासाठी परभणी, बीड, उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, विजापूर, बेळगाव इत्यादी परिसरातून लोक येतात. यावर्षी त्यांना 4 लाख रोपांची ऑर्डर मिळाली आहे. मेकॅनिकची छोटीशी नोकरी करण्यापेक्षा स्वत:च व्यवसाय सुरू करून त्यातून मोठे यश कमावणारे काकासाहेब सावंत यांच्या यशाची कहाणी अनेकांना प्रेरणा देऊ शकते.