सांगली : सांगलीच्या चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणातील संशयित ‘एमआर’चा काल सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सुजित दिलीप कुंभार असं त्याचं नाव आहे. कारागृहात असताना 4 ऑक्टोबरच्या पहाटे कुंभारची तब्येत अचानक बिघडली होती.
रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे कारागृह प्रशासनाने सुजितला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात रात्री उशिरा मृतदेहाची इन कॅमरा उत्तरीय तपासणी करण्यात आली.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने सप्टेंबर महिन्यामध्ये गणेशनगरमधील चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकला होता. त्यानंतर बेकायदा गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. रुपाली चौगुले, तिचा पती डॉ. विजयकुमार चौगुले, विट्यातील डॉ. अविजित महाडिक आणि एमआर सुजित कुंभार यांना अटक केली होती. यातील एक संशयित स्वप्नील जमदाडे अद्यापही पसार आहे.
कुंभार याने डॉ. रुपालीला गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर सर्वच संशयितांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. 29 सप्टेंबर रोजी या सर्व संशयितांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. कुंभार याचीही येथील मध्यवर्ती जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.