सांगली : क्रांती उद्योग व शिक्षण समूह प्रमुख अरुण अण्णा लाड यांच्या वाढदिवसानिमित्त पलूस येथे राज्यस्तरीय कृषी, पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. शेतीमधील आधुनिक सामुग्री, नवे तंत्रज्ञान याबरोबरच शेती विषयक वस्तू, विविध प्रकारची जनावरे आणि खाद्यपदार्थची रेलचेल पाहायला मिळाली. पण या सर्व प्रदर्शनाच्या गर्दीत चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरली ती बुटकी अंबू..

उंची 2 फूट 3 इंच आणि लांबी 3 फूट..हे माप आहे या अंबूचं. ही अंबू म्हणजे खिलार मिक्स जातीची गाय आहे. वय 4 वर्ष 6 महिने. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसरची या अंबूने पलूसमधील कृषी प्रदर्शनात आपल्याकडे चांगलीच गर्दी खेचून घेतली होती आणि ते ही 10 रुपये तिकिटावर बरं का. प्रदर्शनातील सर्वात बुटकी उर्फ लहान गाय अशा आशयाचे फलक प्रदर्शनत ठिकठिकाणी लावून मालकाने अबूचे चांगलंच मार्केटिंग केले होते.



बरं, पलूसमधील या प्रदर्शनातूनच अंबूचं डेब्यू झालंय, असंही म्हणायला हरकत नाही. कारण अंबूच्या मालकाने तिला प्रथमच या प्रदर्शनातून सार्वजनिक केलं होतं. त्यामुळे अख्ख्या प्रदर्शनात या बुटक्या अंबूचीच हवा होती. लोक आपली मुलं, बायका घेऊन 10 रुपयांचं तिकीट काढून अंबूला पाहण्यासाठी आणि तिला मोबाईलमध्ये टिपण्यासाठी गर्दी करत होते. अंबू देखील सर्वांना चालून, इकडे तिकडे फिरुन सर्वांना खुश करत होती.

ही अंबू दिसायला नुसती बुटकी नाही तर ती सात महिन्यांची गाभण देखील आहे. म्हणजे अंबू लवकरच आपल्यासारख्या आणखी एका वासराला जन्म देणार आहे. एखादा माणूस जसा बुटका राहिला असतो तशीच ही गाय देखील बुटकी राहिली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही गाय पाहण्याचा मोह आवरत नाही.

बुटकी गाय अंबूची वैशिष्ट्ये
- अंबू गायीची उंची 2 फूट 3 इंच, लांबी 3 फूट
- गायीचं वय 4 वर्ष 6 महिने
- भारतातातील सर्वात बुटकी म्हणजेच लहान गाय अशी या गायीची ओळख
- अंबु गाय ही खिलार मिक्स जातीची आहे. एखाद्या बुटक्या माणसाप्रमाणे ही गाय आहे
- सर्वसाधारण गायीपेक्षा अंबू ही गाय 25 टक्केच खाद्यं खाते