सांगली :  मुंबईतील मानखुर्दमधून सांगलीच्या कवठेमहांकाळमधील दुधेभावी या आपल्या मामाच्या गावी 27 एप्रिल रोजी पोहोचलेल्या एका व्यक्तीला गुरुवारी कोरोनाची लागण झाली होती. काल त्याच्या पत्नीला कोरोना लागण झाल्याचं समोर आलं आहे. आता या पती-पत्नीच्या संपर्कात आलेल्या आणि सांगली महापालिका क्षेत्रातील कुपवाड भागातील वाघमोडे नगर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे सांगली, मिरज कुपवाड मनपा क्षेत्रात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे.


ही मुलगी  कोरोनाबाधित रुग्णाच्या मेहुणीची मुलगी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी आणि नोडल ऑफिसर डॉ.संजय साळुंखे यांनी दिली आहे.  यामुळे जिल्ह्यातील सध्याच्या घडीची कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीची संख्या 6 वर गेली आहे. महापालिका क्षेत्रातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पुन्हा मनपा प्रशासन आणि जिल्हा प्रशासन अधिक अलर्ट झाले आहे.


कोरोनाबाधित ठरलेल्या दुधेभावी  येथील व्यक्तीशी संबंधित दोन जणांचे अहवाल काल प्रलंबित होते. सदर अहवाल आज सकाळी प्राप्त झाले असून यातील एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आहे. तर वाघमोडे नगर कुपवाड येथे राहणाऱ्या एका जवळच्या नात्यातील व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


त्या व्यक्तीच्या संपर्कातील 28 पैकी 25 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेले आहेत. यामध्ये कोरोना बाधितांच्या एका मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र पत्नीचा आणि यांच्या संपर्कात आलेल्या एका मुलीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सांगलीचा कोरोना आकडा हा आता 6 वर पोहचला आहे.


सांगलीच्या कवठेमंकाळ येथील दुधेभावीमध्ये मूळचा वाळवा तालुक्यातील निपाणी येथील असणारा पण सध्या मुंबईच्या मानखुर्द या ठिकाणी वास्तव्यास असणारा भाजीपाला विक्रेता हा 27 एप्रिल रोजी आला होता. पत्नी व दोन मुलांसह एका वाहनातून चोरुन सोलापूर मार्गे दुधेभावी या आपल्या मामाच्या गावी पोहचला होता. त्यानंतर 28 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या फिवर क्लिनिक तपासणीमध्ये कोरणा लक्षण असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर तातडीने प्रशासनाने 'त्या' व्यक्तीला ताब्यात घेऊन मिरजच्या आयसोलेशन कक्षात दाखल केलं होतं. त्या व्यक्तीचे स्वॅब घेतल्यानंतर गुरुवारी 'त्या'व्यक्तीला कोरोना लागण झाल्याचं समोर आलं होतं.


त्यानंतर प्रशासनाने अधिक गतीने काम करत त्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील पत्नी मुलांसह दुधेभावी, कुपवाडच्या बामणोली आणि त्याच्या मुळगाव असणाऱ्या येडेनिपाणी येथील 28 जणांना क्वारंटाईन करून स्वॅब घेतले होते. आता या कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या पती- पत्नी आणि एका मुलीच्या संपर्कातील आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात येत असून यामुळे सांगली महापालिका क्षेत्रात पुन्हा कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानं  मनपा क्षेत्रातील नागरिकाच्या चिंतेत भर पडली आहे.