सांगली : सांगलीतील बांधकाम मटेरियल सप्लायर्सच्या हत्येप्रकरणी सांगली पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली आहे. अवघ्या आठ तासात इम्रान आणि रफिक शेख या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शनिवारी रात्री सुभाष बुवा या बांधकाम कंत्राटदाराची निर्घृण हत्या झाली होती. पूर्ववैमनस्यातून हा खून केल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे.


सांगलीच्या संजयनगर नजीक शनिवारी रात्री बांधकाम मटेरियल सप्लायर सुभाष बुवा यांची हत्या करण्यात आली होती. धारदार शस्त्रांनी एकामागून एक 12 वार केल्याने बुवा यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सांगली शहर परिसरात खळबळ उडाली होती.

या खुनाचा छडा लावण्याचं सांगली पोलिसांसमोर आव्हान होतं. पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने शीघ्रगतीने तपास करत या हत्या प्रकरणी दोघा तरुणांना अटक केली आहे. इम्रान शेख आणि  रफीक शेख अशी दोघा संशयितांची नावे आहेत. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या आठ तासात पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी शेख आणि सुभाष बुवा यांच्यात वाद झाला होता. या वादातून सुभाष बुवा यांची घरासमोर उभी असलेल्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे शेख आणि बुवा यांच्यात वाद वाढला होता. हे प्रकरण त्यादिवशी मिटवण्यात आले होते.

यानंतर काल, शनिवारी सुभाष बुवा यांना मोबाईल वरून घराबाहेर बोलावत घरापासून काही अंतरावर असणाऱ्या संजयनगर नजीक सुर्यनगर येथे शस्त्रांनी हल्ला करत निर्घृण खून करण्यात आला. घटनेनंतर हल्लेखोर शेख हे पसार झाले होते. याबाबत रात्रीतच शिताफीने तपास करत पहाटेच्या सुमारास सांगली नजीकच्या सूतगिरणी-कृपामय रस्त्यावर सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.