सांगली : सांगलीत एका महिलेने आपल्या सहा महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पती आणि सासू-सासऱ्यांच्या दबावामुळे पोटच्या पोराचा जीव घेतल्याची कबुली तिने दिली आहे.


सांगलीतील तासगाव तालुक्यातल्या विसापूरमध्ये हा प्रकार घडला. पती, सासू-सासरे यांचा दबाव आणि जाचामुळे आपल्या बाळाची हत्या केल्याचं महिलेने मान्य केलं. या प्रकरणी तिच्यासह पती, सासू , सासऱ्याला तासगाव पोलिसांनी अटक केली आहे.

25 जानेवारी 2016 रोजी या जोडप्याचा विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवस दोघांचा संसार सुरळीत सुरु होता. दोन महिन्यानंतर महिला गरोदर राहिली. गरोदर राहिल्यानंतर तिच्या पतीसह, सासू, सासर्‍यांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली.

अवघ्या दोन महिन्यांत तू गरोदर कशी राहिलीस? अशी शंका उपस्थित करुन तिला शिवीगाळ केली जात असे. शारीरिक, मानसिक त्रास देऊन तिचा छळ केला जाऊ लागला.

गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात ती माहेरी गेली. प्रसुतीनंतर काही महिन्यांनी ती आपल्या मुलाला घेऊन पुन्हा सासरी आली. सासरी आल्यानंतरही तिचा सासरच्या मंडळीकडून छळ सुरुच राहिला. याला कंटाळून त्या महिलेने आपल्या मुलाचा गळा आवळून खून केला.

या प्रकरणी पोलिसांच्या तक्रारीनुसार आई सुनिता अर्जुन चव्हाण, पती अर्जुन भगवान चव्हाण, सासू आनंदी भगवान चव्हाण, सासरे भगवान भीमराव चव्हाण यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.