आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे
एबीपी माझा वेब टीम | 28 Feb 2018 03:01 PM (IST)
प्रशांत परिचारक यांच्या चौकशीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला.
मुंबई : जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. प्रशांत परिचारक यांच्या चौकशीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घ्यावं, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली होती. हा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला. प्रशांत परिचारक यांचं दीड वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर चौकशीसाठी समिती नियुक्ती करण्यात आली होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर या समितीचे अध्यक्ष होते. काय आहे प्रकरण? महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रशांत परिचारक यांची सभा होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत, विरोधकांवर टीका करण्याच्या नादात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला होता. “पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे, ” असं वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं.