सांगली : सांगलीत गर्भपातादरम्यान स्वाती जमदाडे नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हैसाळ गावातील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेच्या भारती हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात करण्यात येत असल्याचं उघड झालं आहे.


स्वाती जमदाडेचा मृत्यू देखील म्हैसाळमधील याच भारती हॉस्पिटलमध्ये झाला होता. हॉस्पिटलजवळच्या परिसरात पोलिसांनी तपास केला असता त्यांना 19 मृत अर्भकं सापडली आहेत. या प्रकरणातील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची 5 पथकं रवाना करण्यात आली आहेत.

बाबासो खिद्रापुरे बीएचएमएस असून मूळचा शिरोळ मधील नरवाडचा रहिवासी आहे. मागील 10 वर्षांपासून त्याचं  म्हैसाळमध्ये हॉस्पिटल आहे. अनेक वर्षांपासून तो नियमबाह्य पद्धतीनं गर्भपात करत असल्याचा आरोप आहे. या व्यवसायात त्याची पत्नी देखील सहभागी असल्याची शक्यता आहे.

डॉक्टरच्या अन्य सहकारी आणि कंपाऊंडरकडे याबाबत कसून चौकशी सुरु आहे. जिल्हा शल्य चिकित्सक विभागाचे अधिकारी डॉ. खिद्रापूरेच्या हॉस्पिटलवर दाखल झाले असून सर्व औषधाची आणि कागदपत्रांची तपासणी सुरु आहे.