Maharashtra Konkan News : महाराष्ट्राची (Maharashtra News) चेरापुंजी (Cherrapunji) म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत (Amboli) पावसाअभावी पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. आंबोलीचं पर्यटन हे पावसावर अवलंबून असतं, पाऊस पडला तर आंबोलीच्या जैवविविधतेत भर पडून निसर्गानं हिरवागार शालू अंथरावा अशा हिरवाईनं आंबोली निसर्ग सौंदर्यानं नटलेलं असतं. हे हिरवाईनं नटलेलं आंबोली पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं. पण सध्या पर्यटकांना भूरळ घालणारं आंबोली कोरडं ठाक पडल्याचं पाहायला मिळत आहे. 


आंबोलीचं मुख्य आकर्षण म्हणजे, आंबोलीच्या परिसरात उंचावरून फेसाळत कोसळणारे धबधबे. मात्र पावसा अभावी हेच धबधबे आता कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांचा मोठा हिरमोड होत आहे. आंबोलीत पर्यटक येत नसल्यानं किंवा थांबत नसल्याने याचा परिणाम थेट पर्यटन व्यवसायावर होत आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायिक हवालदिल झाले आहेत. दरवर्षी एवढ्यात आंबोलीत वर्षा पर्यटनाला बहर येत असतो. आंबोलीतील धबधबे प्रवाहित होऊन मोठ्या संख्येनं पर्यटक देखील आंबोलीत दाखल होत असतात. मात्र यावर्षी पाऊस पडला नसल्यानं आंबोलीतील धबधबे कोरडे ठाक पडल्याचं पाहायला मिळत आहे.


आंबोलीचं मुख्य आकर्षण म्हणजे, आंबोलीतील फेसाळत उंचावरून कोसळणारे धबधबे आणि हिरवागार नटलेला निसर्ग. मात्र पाऊस नसल्यानं धबधबे कोरडे ठाक पडले आहेत. तर यावर्षी पाऊस उशिरानं होत असल्यानं आंबोलीच्या जैवविविधतेवर सुद्धा परिणाम होणार असल्याची भीती पर्यावरण प्रेमींना सतावतेय. कारण आंबोलीच्या जैवविविधतेत पावसाचा मोठा वाटा असतो. देशात चेरापुंजीनंतर सर्वाधिक पाऊस हा आंबोलीत कोसळतो. साधारणपणे दहा ते बारा हजार मिलिमीटर पाऊस आंबोलीत कोसळतो. त्यामुळेच आंबोलीची जैवविविधता खुलून दिसते. ऊन, पाऊस, धूकं आणि उंचावरून फेसाळत कोसळणारे धबधबे हे आंबोलीचं मुख्य आकर्षण पाहुन पर्यटक दरवर्षी सुखावतात. त्यामुळे देशविदेशातील पर्यटक दरवर्षी आंबोलीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात.


आंबोलीतील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी खास गुजरातवरुन आलेल्या एका पर्यटकानं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, गुजरातवरून खास महाराष्ट्रातील सिंधुदुर्गातील आंबोलीचा धबधबा पाहण्यासाठी आलो होतो. मात्र आंबोलीत आल्यानंतर डोंगरावरुन कोसळणारे धबधबे कोरडे ठाक पडल्याचं धबधब्याच हे चित्र पाहिल्यानंतर हिरमोड झाला. आणखी एका पर्यटकानं सांगितलं की, आंबोली हे सर्वाधिक पाऊस पडण्याचं ठिकाण असून आंबोलीमधील जैवविविधता आणि धबधबे नेहमीच आम्हाला आकर्षित करतात. मात्र इथे आल्यानंतर धबधबे कोरडे ठाक पडल्याचं चित्र पाहून हिरमुसल्यासारखं झालं. 


दरम्यान, 15 ते 16 मे पासून आंबोलीत पाऊस पडायला सुरुवात होते. मात्र यावर्षी जून महिना संपत आला तरी देखील पावसाचा पत्ता नाही. पावसाअभावी आंबोलीतील पर्यटनाला खीळ बसली असून आंबोलीच्या पर्यटनावर आमची वर्षभराची रोजीरोटी असते. मात्र पर्यटन ठप्प झाल्यानं आमच्या पर्यटन व्यवसायावर याचा मोठा परिणाम होत असून याचा फटका पर्यटन व्यवसायिकांना बसत आहे.