सोलापूर : वाळू माफिया किती मस्तवाल झाले आहे याचा प्रत्यय सोलापुरातील एका घटनेवरुन समोर आलं आहे. अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याचा काटा काढण्यासाठी वाळू माफियांनी त्याच्या सहकारी महिलेला सुपारी दिली आहे. थोडी-थोडकी नव्हे तर तब्बल 50 लाख रोख, दहा एकर जमीन आणि दरमहा पाच लाखांचं मानधन.

माहिती अधिकार कार्यकर्ते शरद कोळी गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरमधील वाळू माफियांविरोधात लढा देत आहेत. नुकत्याच झालेल्या हल्ल्यामुळे शरद कोळी यांना पोलिस संरक्षण आहे. त्यामुळे त्यांना फसवून मारण्याचा माफियांचा प्रयत्न सुरु आहे. या संपूर्ण प्रकरणाची सोलापूर ग्रामीण पोलिस चौकशी करत आहे.

शरद कोळी यांना एकांतात गाठून त्यांची हत्या करण्याच्या उद्देशाने वाळू माफिया शरद कोळींच्या सहकारी मिनाक्षी टेळे यांच्या घरी पोहोचले. मुलाबाळांला जीवे मारण्याची धमकी देऊन, शरद कोळी यांना एकांतात बोलवण्याची मागणी वाळू माफियांनी मिनाक्षी टेळे यांच्याकडे केली. इतकंच नाही तर या कामाचा मोबदला म्हणून 50 लाख रुपये, 10 एकर जमीन आणि आयुष्यभर दरमहा 5 लाखांचं मानधनाचं आमिष दाखवलं.

मिनाक्षी टेळे या मंद्रूपच्या शिवसेना अध्यक्ष आहेत. शरद कोळी हेदेखील शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. कोळीला विश्वासात घेऊन एकांतात बोलावण्यासाठी मिनाक्षी टेळे यांना वाळू माफियांनी सुपारी देण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेने याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. स्थानिक पोलिस ठाण्याने दखल न घेतल्याने त्यांनी थेट पोलिस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे.

शरद कोळी दहा वर्षांपासून वाळू माफियांविरोधात लढत आहेत. कोणत्याही अमिषाला ते बळी पडत नसल्याने अखेर त्याला मारण्यासाठी माफियांनी सुपारी देण्याचा आटापिटा सुरु केला आहे. 2012 साली आणि गेल्या महिन्यात माफियांनी कोळींवर प्राणघातक हल्ला केला होता. कोळींना सध्या पोलिस संरक्षण देण्यात आलं आहे. पण पोलिस आणि महसूल प्रशासन वाळू माफियांना अभय देत असल्याचा आरोप कोळी यांनी केला आहे.