कल्याण : कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बुधवारी सायंकाळी अचानक धाड टाकली.


यावेळी हजारो ब्रास रेतीसह 200 बोटी, 150 पंप, 44 क्रेन आणि काही ड्रेझर जप्त करण्यात आले आहेत. या सर्व साहित्याची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत जिल्हाधिकारी कल्याणकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. तिथून ठाण्याला परतताना अचानक जिल्हाधिकाऱ्यांनी रेतीबंदरावर धडक देत कारवाई सुरू केली.

या अचानक झालेक्या कारवाईमुळे रेतीमाफियांसह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली.

जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी स्वतः या ठिकाणी फिरून येथील 132 अवैध जेट्टींसह सर्व साहित्य जप्त करून नष्ट करण्याचे आदेश दिले. याशिवाय महसूल आणि बंदर विभागाच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याचीही दाट शक्यता आहे.