मुंबई : शिवसेनेच्या खांदेपालटासंदर्भात आज अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या विधानपरिषद गटनेतेपदी अनिल परब यांची वर्णी लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेतील सेनेच्या इतर सदस्यांना खांदेपालटाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
विधानपरिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी गेल्या काही काळापासून दिवाकर रावते होते. मात्र मंत्रिमंडळात असल्याने त्यांना शिवसेनेची भूमिका नीट मांडता येत नव्हती. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनिल परब यांनी मोलाची कामगिरी करत शिवसेनेला आपला गड राखण्यास मदत केली होती. त्याचंच बक्षीस म्हणून त्यांची विधानपरिषद गटनेतेपदी वर्णी लागल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाचं म्हणजे खांदेपालटात ज्येष्ठ मंत्र्यांवर टांगती तलवार आहे. यासंदर्भात आज शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची आमनेसामने बैठक होणार आहे.
शिवसेनेच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी अनिल परब : सूत्र
विधानपरिषदेतील मंत्र्यांवर टांगती तलवार
आरोग्य मंत्री दीपक सावंत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना पक्षसंघटना बांधणीच्या जबाबदारीसाठी मंत्रिमंडळातून पद मुक्त केली जाण्याची शक्यता आहे.
गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांना आमदारांची नाराजी भोवण्याची चिन्हं आहेत, तर आक्रमक असलेल्या सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची कॅबिनेटपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
येत्या काळात शिवसेनेच्या अजेंड्यावर ‘मिशन विदर्भ’ असल्याने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याबद्दल राज्यमंत्री संजय राठोड यांना बढती मिळू शकते.
तर ग्रामीण भागातील चेहऱ्यांना संधी देण्यावर पक्ष नेतृत्वाचा भर असेल.
यामध्ये कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर, रत्नागिरीचे उदय सामंत, यवतमाळचे तानाजी सावंत, निफाडचे अनिल कदम, पारनेर (अहमदनगर) - विजय औटी आणि पाटणचे शंभूराजे देसाई यांची नावं आघाडीवर आहेत.
संबंधित बातम्या
शिवसेना मंत्र्यांच्या खांदेपालटाची चर्चा, अनेक मंत्र्यांना डच्चू?
शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक
उद्धव ठाकरेंकडून पक्षांतर्गत मोठ्या फेरबदलांचे संकेत : सूत्र