पंढरपूर : पंढरपुरात चंद्रभागेच्या पाण्यात खेळणाऱ्या 4 चिमुरड्यांना आपला जीव गमावावा लागला. काल घडलेल्या या घटनेनंतर चंद्रभागेत होणारा अवैध वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासत, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चंद्रभागेच्या पात्रात बेसुमाररित्या वाळू उपसा केला जातो. त्यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झालेत. एका क्षणी घोट्याएवढं असलेलं पाणी पुढच्याच पावलात तुम्हाला खड्ड्यात पाडू शकतं. नदीच्या याच अवस्थेमुळे या लहानग्यांचा जीव गेल्यानं आता संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेनंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तातडीने घटनास्थळास भेट दिली. तर आज राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र संतप्त महिलांनी सावरा यांना घेराव घालत, वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली .
पंढरपूरची आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली असताना झालेल्या या घटनेनं प्रशासन हादरुन गेलं असून अवैधरित्या होणाऱ्या वाळू उपशाला अंकुश लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
संबंधित बातम्या
चंद्रभागा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू