Maharashtra Samruddhi Mahamarg : शिवसेनेचे बडे नेते मानले जाणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेवरच बंड उगारत थेट गुजरात गाठलं. आता कमळाच्या जोरावर वाघासमोर नवं आव्हान उभं करणार असल्याचं म्हटलं जातं आहे. एकनाथ शिंदे यांचा गैरसमज दूर करून त्यांची पुन्हा घरवापसी करण्यासाठी शिवसेनेचे बडे नेते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. असे असले तरी ज्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची वर्धा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली होती तोच प्रकल्प अजूनही अर्धवटच असल्याचं 'एबीपी माझाने केलेल्या रियालिटी चेकमध्ये दिसून आलं आहे.
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत आपला वेगळा ठसा कायम ठेवणाऱ्या मंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या वर्धा जिल्ह्यातील कामाची पाहणी केली होती. या गोष्टीला दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. समृद्धी महामार्गावर नुकताच काळविटाचा जोडा धावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यामुळे समृद्धी महामार्गाविषयी उलट-सुलट चर्चेला उधाण आलं होतं. याच समृद्धी महामार्गाचे रियालिटी चेकमध्ये वर्धा जिल्ह्यातील 36 आदिवासींनी आपली शेतजमीन दिल्याचंही पुढे आलं आहे.
संरक्षण भिंतीचं काम अर्धवटच
समृद्धी महामार्गावर वन्य प्राणी किंवा मोकाट जनावरं थेट जाऊ नये म्हणून या रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण भिंती उभारण्यात आल्या आहेत, हे काम जवळपास 70 टक्के पूर्ण झाले असले तरी महत्त्वाच्या ठिकाणी हे काम अर्धवटवच आहे. त्यामुळे या रस्त्यावर जनावर आणि वन्यप्राण्यांचा वावर होण्याची दाट शक्यता आहे
शिंदेंनी स्वतः कार चालवून केली होती पाहणी
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण अद्यापही झालेलं नाही, या लोकार्पणाबाबत अनेकांमध्ये उत्सुकता कायम आहे. या मार्गावर वाहने सुमारे दीडशे किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहेत. त्यामुळे या महामार्गाचे काम पूर्ण झाले की नाही याची पाहणी नामदार एकनाथ शिंदे यांनी स्वतः समृद्धी महामार्गावर कार लावून केली होती, यावेळी त्यांनी रस्त्याच्या कडेला डोकावून पाहिलं नाही. त्यांनी जर रस्त्याच्या कडेला बारकाईने डोकावून पाहिले असते तर त्यांना हे पितळ नक्कीच लक्षात आले असते, पण तसे झाले नाही ही शोकांतिकाच.
एकनाथ शिंदेंची घरवापसी होणार की हकालपट्टी?
शिवसेनेत असताना वाघाची डरकाळी फोडणारे एकनाथ शिंदे सध्या गुजरातच्या भूमीवरून शिवसेनेलाच गुर्रावनी देत आहे. असे असले तरी छगन भुजबळ असो वा नारायण राणे यांना शिवसेनेशी बंड केल्यानंतर त्याचे विपरीत परिणामच भोगावे लागले हा इतिहास आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची घरवापसी होते की त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या