रायगड : मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्या अन् शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड हे दृष्य या वर्षीही महाराष्ट्राला आणि देशाला दिसणार नाही. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने समस्त शिवभक्तांनी रायगडवर न येता आपल्या घरातच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. 


दरवर्षी 5 आणि 6 जूनला रायगडवर थाटामाटात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल. तसेही सरकारने केवळ 20 लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदा सुद्धा "शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात" साजरा करणे, ही जबाबदार शिवभक्ताची ओळख ठरेल असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलं आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवभक्तांना हे आवाहन केलंय.


संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवप्रेमींना दुर्गराज रायगडावर न येता राज्याभिषेक सोहळा विधायक उपक्रम राबवून आपल्या घरातच साजरा करण्याचे आवाहन केलं होतं. सर्व शिवभक्तांनी माझ्या या विनंतीला मान दिला. तसेच, निसर्ग वादळ आणि कोरोनाचे आव्हान असताना, आपल्या राज्याभिषेक सोहळ्याच्या  परंपरेला खंड पडू  देणार नाही, हा शब्द मी सर्वांना दिला होता. तो मी पूर्ण केला."


संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणतात की, "दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे या वर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन मी पुन्हा करत आहे. स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत. सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी."
 
माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे, यासाठी आपण घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन असंही संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्ट केलं आहे. 


 



महत्वाच्या बातम्या :