नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असली तरी लसींचा तुटवडा असल्याने त्यात अनेक अडथळे येत असल्याचं दिसून येतंय. पण आता एक दिलासादायक बातमी येण्याची शक्यता आहे. अमेरिकन लस निर्मिती कंपनी फायझरने या आधीच भारताकडे लसीच्या वापराला मंजुरी मिळावी अशी मागणी केली होती. आता ही मंजुरी अंतिम टप्प्यात असल्याचं समजतंय. ही मंजुरी मिळाली तर पुढच्याच महिन्यात फायझरची पहिली खेप भारतात येण्याची शक्यता आहे.
भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा वापर लसीकरणाच्या कार्यक्रमात करण्यात येत आहे. त्या नंतर रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीच्या वापराला मंजुरी मिळाली. आता फायझरच्या वापराला मंजुरी मिळाली तर ती देशातील चौथी लस ठरणार आहे. सध्या फायझरच्या लसीचा वापर अमेरिका, युरोप आणि जपानमध्ये करण्यात येत आहे.
फायझर आणि मॉडर्ना या कंपनींनी त्यांच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी अशी विनंती भारत सरकारकडे केली होती. आता फायझरच्या लसीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून मॉडर्नासोबतही चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येतंय.
भारत सरकारने सुरु केलेल्या कोरोना लसीकरणाच्या व्यापक कार्यक्रमासाठी अमेरिकन लस उत्पादन करणारी कंपनी फायझरने 'ना नफा' या तत्वावर म्हणजे कोणताही आर्थिक फायदा न कमावता लसीचा पुरवठा करण्याची ऑफर भारत सरकारला दिली होती. त्या संबंधी भारत सरकारशी चर्चा सुरू आहे अशी माहितीही कंपनीच्या वतीने त्यावेळी देण्यात आली होती. त्या अंतर्गत पाच कोटी लसीचे डोस देण्याची तयारी कंपनीने दर्शवली होती, पण त्यासाठी काही नियमांत भारत सरकारने सुट द्यावी अशी मागणी कंपनीच्या वतीनं करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या :
- देशातल्या प्रत्येक पत्रकाराला केदारनाथ निवाड्याचं घटनादत्त संरक्षण, विनोद दुवा खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण
- Coronavirus Cases India : देशात सलग 21व्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्येहून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक; गेल्या 24 तासांत 2887 रुग्णांचा मृत्यू
- Corona Vaccination : फायझर, मॉडर्ना कंपन्यांच्या ऑर्डर फुल्ल; भारताची लसींसाठीची प्रतीक्षा अनिश्चित काळासाठी वाढली