मुंबई : गरजू शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार असून, ही इतिहासातली सर्वात मोठी कर्जमाफी असेल. शिवाय, यासाठी टेक्नॉलॉजीचा आधार घेणार आहोत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


कर्जमाफीवर मुख्यमंत्री काय म्हणाले?

“31 ऑक्टोबर आधी गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. ही इतिहासातली सर्वात मोठी कर्जमाफी असेल. यावर अभ्यास करण्यासाठी 4 महिन्यांचा वेळ घेण्यात आला आहे.”, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

“मागच्या काळात कर्जमाफीसाठी घोटाळा झाला आहे, तो होऊ नये म्हणून IT बेस्ड टेक्नॉलॉजीचा आधार घेणार आहोत.”, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या संपावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

“जे शेतकऱ्यांचे खरे नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत. मात्र, शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण करणाऱ्यांशी चर्चा होऊ शकत नाही.”, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय, कर्जमाफीबाबत ज्यांना सूचना द्यायच्या आहेत त्यांचे स्वागत आहे, असेही त्यांनी सांगितले.

व्यंकय्या नायडू कर्जमाफीवर काय म्हणाले?

“यूपी, तेलंगणा, आंध्रमध्ये कर्जमाफी झाली, ती त्या राज्यांनी दिली. त्यांची परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्राची स्थिती वेगळी आहे. दूरगामी निर्णय घ्यावे लागतील. मुख्यमंत्री फडणवीसांना ज्या परिस्थितीत राज्य मिळालं, ते पाहा. आमची सहनुभूती आहे जेवढं शक्य असेल तेवढं देणार.”, असे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले. शिवाय, शिवसेना आणि राजू शेट्टींनी आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी सरकारमध्ये राहून काय करतील हे पहावं, असेही ते म्हणाले.

हिंसा करणाऱ्यांची माझ्याकडे संपूर्ण माहिती : मुख्यमंत्री

“307 बाजार समित्यांपैकी 300 कार्यरत होत्या. इतर 7 पैकी 3 बाजारात समित्यांनी बंद पाळला, तर बाजार समित्या 4 सुट्टीवर होत्या.”, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. शिवाय, हिंसा झाली त्याठिकाणी कुठल्या पक्षाचे लोक होते, याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे, असेही ते म्हणाले.