सारथीची बैठक समाधानकारक, 12 महत्वाच्या मागण्या मान्य केल्याची संभाजीराजे छत्रपतींची माहिती
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार छत्रपती संभाजीराजे, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक आणि सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांची नवीन सर्किट हाऊस येथे बैठक पार पडली आहे. सारथी संस्थेसंदर्भात समाधानकारक चर्चा झाली असून सरकारने आपल्या महत्वाच्या 12 मागण्या मान्य केल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
मराठा समाजाच्या मूक आंदोलनाची दखल घेऊन आज सारथी संस्थेविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत समाजाच्या सारथी संबंधी प्रमुख बारा मागण्यांपैकी बहूतांश मागण्या पूर्णतः मान्य करून घेण्यात आल्या आहेत. सारथी संस्थेला पूर्णतः स्वायत्तता असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीत पुनश्चः स्पष्ट केल्याचे संभाजीराजेंनी सांगितलं. राज्यात सारथीची आठ विभागीय कार्यालये सुरू करण्यास मंजूरी देण्यात आली असून कोल्हापूर येथे उपकेंद्र सुरू करण्यासाठी नियोजित जागेची पाहणी करून अहवाल देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीत निर्देश दिले.
सारथी लाभार्थीसाठी उत्पन्न मर्यादा 8 लाख असून त्यात 1 लाखाच्या आत, 3 लाखाच्या आत, 3 ते 5 लाखाच्या आत व 5 ते 8 लाखाच्या आत असे टप्पे तयार करून अभ्यासक्रम निहाय सारथी कडून देण्यात येणारे विद्यावेतनाची टक्केवारी ठरविण्यात येईल, जेणेकरून जास्तीतजास्त गरीब विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ मिळू शकेल, यादृष्टीने निर्णय घेण्यात आला.
सारथी प्रशासनासाठी आवश्यक असणारी पदे तात्काळ भरण्याचे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिले. तसेच, तारादूत प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासंबंधी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. याचबरोबर, सारथीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथाची छपाई करून त्याचे तात्काळ वितरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच आपण मागणी केलेल्या 1000 कोटी रूपयांच्या निधीबाबत मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन 20 दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.