लातूर : कामगार मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खुर्चीचा प्रतिकात्मक लिलाव लातूरमध्ये करण्यात आला. यावेळी पाच हजारांपासून सुरु झालेली बोली 45 हजारांवर पोहचली.


शेतमाल भाव, कायमस्वरुपी वीज आणि शेतपिकाच्या झालेल्या नुकसानाचे पैसे मिळावेत, यासाठी आम्हाला सत्ता द्या असं सांगणारे पालकमंत्री सत्ता आल्यावर काहीच करत नाहीत, असा आरोप करत शिवसेना शेतकरी संघटना आणि काही संघटनांनी एकत्र येत पालकमंत्र्याच्या खुर्चीचा लिलाव निलंग्यात आयोजित केला.

जवळपास दीड हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी यात सहभागी घेतला होता. पाच हजारावरुन सुरु झालेली बोली 45 हजारांवर गेली. छावा संघटनेने 45 हजाराची अंतिम बोली लावली. यातील रक्कम निलंगा येथील दोन शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, तर एक हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहेत.

यावेळी शिवसेनेचे नेते अभय साळुंके, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ बनसोडे हजर होते. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शेतकरी संघटनेचा पाठिंबा होता. संभाजी पाटील यांचे काका, काँग्रेसचे नेते अशोक पाटील यांचाही पाठिंबा होता.