औरंगाबाद : औरंगाबाद की संभाजीनगर यावरून गेल्या तीस वर्षांपासून औरंगाबादचं राजकारण केंद्रीत आहे. शिवसेनेच्या वतीने संभाजीनगरची हाक दिली होती. सत्तेत आल्यानंतर संभाजीनगर नामकरण करणार असं आश्वासन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचेही दिसून आले. दुसरीकडे सरकारी पातळीवर अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. मात्र, आता राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या जीआर म्हणजेच शासन निर्णयावर 'औरंगाबाद'च्या अगोदर 'संभाजीनगर' असा उल्लेख केला गेला आहे.
औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यासाठी शासन स्तरावरही औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रस्ताव पाठवून हालचाली केल्या होत्या. मात्र आता थेट शासनाच्या 'जीआर'वरच संभाजीनगरचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्य शासनाने राज्य जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदमध्ये उद्योजक राम भोगले यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड केली आहे. त्याचा जीआर सरकारने काढला आहे. त्या जीआरमध्ये राम भोगले यांच्या नावासमोर संभाजीनगर आणि नंतर औरंगाबाद असा उल्लेख केला आहे. त्यामुळे कागदोपत्री संभाजीनगर असे नामकरण होतंय का?, या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे.
राज्य शासन निर्णयाद्वारे राज्याचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले आहे. राज्यामध्ये परकीय व देशांतर्गत गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषद (Global Investment Promotion Council) स्थापन करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये आवश्यकतेनुसार राज्यातील प्रमुख औद्योगिक संघटनांचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सल्लागार संस्था, देश विदेशातील व्यक्ती अथवा नामांकित संस्थांचे प्रतिनीधी यांचा विशेष निमंत्रित म्हणून नियुक्त करण्यासंबंधी नमूद करण्यात आले आहे. त्यास अनुसरुन राज्यातील जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेमध्ये (Global Investment Promotion Council) उद्योग क्षेत्राशी संबंधित 5 सदस्यांना विशेष निमंत्रित म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्यात नितीन पोतदार, प्रशांत गिरबने, प्रसन्न सरंबळे (मुंबई), राम भोगले, औरंगाबाद, सुरेश राठी, नागपूर यांचा समावेश आहे. मात्र यातील राम भोगले यांच्या नावासमोर औरंगाबादच्या अगोदर संभाजीनगरचा उल्लेख करण्यात आला आहे.
औरंगाबाद शहराच्या नावाचा इतिहास काय
या शहराचं नावाजलेलं नाव म्हणजे खडकी, हा परिसर बेसाल्ट खडकावर वसलेला आहे त्यात शहरात अगदी प्राचिन असे खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे याच नावावरून या शहराचे नाव खडकी पडले असावे असं इतिहासात नोंद आहे. त्याकाळी या शहराचा राजा मलिक अंबर होता ख-या अर्थानं नहरे ए अंबरी सारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारून त्यानं या गावाचं शहर केलं मात्र त्यानंही या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही, कालांतरानं 1633मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान या शहराचा राजा झाला आणि त्यानं आपल्या नावावरून या शहराचे नाव फतेहनगर असे ठेवले. 1653 मध्ये औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला त्यानं पुन्हा या शहराचं नाव फतेहनगर वरून खुजिस्ता बुनियाद असे ठेवले, कालांतराने हे नाव सुद्धा बदलण्यात आले आणि त्यानंतर या शहराला सध्याचे आहे हे औरंगाबाद हे नाव मिळालं. ब्रिटीश काळातही हेच नाव कायम राहिले.