कोल्हापूर : अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'हे राम नथुराम' या नाटकाला आमदार नितेश राणेंची स्वाभिमान संघटना आणि संभाजी ब्रिगेडने जोरदार विरोध केला आहे. कोल्हापुरात आज शरद पोंक्षे लिखित ‘हे राम नथुराम’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. मात्र, स्वाभिमान संघटना आणि संभाजी ब्रिगेडने हा प्रयोग उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.


"राष्ट्रपिता महात्माग गांधी यांच्या खुन्याला म्हणजेच नथुराम गोडसेला देशभक्त असल्याचं दाखणारं हे नाटक आहे. त्यामुळे आम्ही कोल्हापूरची जनता हे नाटक होऊ देणार नाही, उधळून लावू. तरीही कोल्हापुरात या नाटकाचा प्रयोग केल्यास कोल्हापुरी हिसका दाखवू", असा इशारा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर यांनी दिला आहे.

संभाजी ब्रिगेडचे अभिषेक मिठारी यांनीही 'हे राम नथुराम'च्या प्रयोगाला विरोध दर्शवला आहे. अभिषेक मिठारी म्हणाले, “कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे आणि महापालिकेचं नाट्यगृह असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहात या नाटकाला परवानगी दिली गेलीय. म्हणजेच काँग्रेसच गांधीप्रेम हे बेगडी आहे. या बेगडीप्रेमाचा भांडाफोड संभाजी ब्रिगेड करणार आहे.” असे अभिषेक मिठारी यांनी सांगितले.

विरोधानंतरही नाटक झाल्यास काँग्रेस कमिटीच्या कार्यलयाबाहेर आणि महापौरांच्या दालनात बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला आहे.