सोलापूर - लाडावलेल्या मुलाने आईच्या मदतीने चक्क आपल्या जन्मदात्या बापाचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यात घडला आहे. विशाल घुगे असं या आरोपी मुलाचे नाव आहे. मृत अंगद घुगे हे सोलापुरातल्या बार्शी येथील रहिवासी असून कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत होते. 14 जानेवारीपासून अंगद घुगे हे आपल्या बेपत्ता होते. त्यामुळे त्यांचा तपास सुरु असताना कुर्डुवाडी तालुक्यातील लऊळ गावाजवळील शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


पोलिसांच्या माहितीनुसार घुगे यांची तीष्ण हत्याराने हत्या करुन ओळख पटू नये यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचं प्रथमदर्शनी दिसत होते. मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जळाल्याने लागलीच ओळख पटली नाही. मात्र पोलिसांच्या तपासात मृत व्यक्ती बार्शी येथील कृषी सहाय्यक अंगद घुगे असल्याचे समोर आले. यामध्ये पोलिसांनी संशयावरुन मुलगा विशाल घुगे यास अटक करुन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. धक्कादायक म्हणजे यात ग्रामसेवक असलेली आई जयश्री दराडे-घुगे ही मुख्य सूत्रधार असल्याचे ही समोर आले.

मुलगा विशाल याच्या मित्रांनी विश्वासात घेऊन त्यांना घुगे यांना संपवण्यासाठी 10 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. बायकोच्या लाडामुळे मुलगा विशाल कुमार्गाला लागला असा दोष मृत अंगद घुगे हे नेहमी देत होते. घटनेच्या काही दिवसाआधीच विशालने महागडा मोबाईल खरेदी केला होता. तर दीड लाख रुपयांची दुचाकी घेतली होती. यावरुन घुगे यांचे पत्नी जयश्री, मुलगा विशाल यांच्यासोबत वाद देखील झाले होते. विशाल यांच्या स्वच्छंदी वागण्यास घुगे यांचा अडसर होत असल्यामुळे हत्येच्या सुपारी दिल्याची माहिती समोर येत आहे.

विशालने दिलेल्या माहिती वरुन आई जयश्री घुगे यास पोलिसांनी अटक केली आहे. तर गुन्ह्यात सहभागी असलेल्या विकी शिंदे, अतुल गांधले या दोघांचा ही पोलिस शोध घेत असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. यामध्ये आणखी गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान आरोपी जयश्री घुगे या ग्रामसेविका असून त्यांच्याकडे सोलापुरातील रुई आणि रातंजन ग्रामपंचातीचा कारभार होता. खुनाच्या घटनेपूर्वी चार दिवस आरोपी त्यांच्या मागावर होते. मात्र दोन वेळी त्यांच्या हत्येचा कट फसला होता. मात्र तिसऱ्या वेळी घुगे दुर्दैवी ठरले. खुनासाठी आरोपींनी स्कॉरपियो गाडीचा वापर केला होता. गाडीचा वापर केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी गाडी धुण्यात आली होती. मात्र गाडीच्या स्पीकरच्या भागावर रक्ताचे डाग पोलिसांना आढळले. त्यामुळे हत्येचा उलगडा होऊ शकला. या प्रकरणी सूत्रधार असलेल्या आरोपी ग्रामसेवक जयश्री घुगे यांना पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता पोलिसांच्या चौकशीत हत्येचा घटनाक्रम उलघडण्यात मदत होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आई-वडील उच्चशिक्षित आणि आर्थिक परिस्थिती सधन असताना वाममार्गामुळे मुलानेच आईच्या मदतीने केलेल्या या हत्येमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

संबंधित बातम्या