मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेहमी सोबतच असतात. कोणत्याही कार्यक्रमाला ते दोघे एकत्रच असतात. या कार्यक्रमाला आज मी येणारच नव्हतो. पण प्रशांत यांच्यासाठी आलो. नाहीतर उगाच लोकांना वाटायचं एकावर एक फ्री मिळतात हे, अशी टोलेबाजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यंत्री फडणवीस यांच्यार केली.
अभिनेते प्रशांत दामले यांच्या 12 हजार 500 व्या प्रयोगाचे सादरीकरण आज मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे बोलत होते.
राज ठाकरे यांनी यावेळी प्रशांत दामले यांचं कौतुक केलं. "प्रशांत दामले यांनी आपल्या आयुष्यातील खूप वेळ नाटकांसाठी दिला आहे. सरासरी तीन तासांचे नाटक असतं. 12 हजार 500 प्रयोग झाले म्हणजे दामले 37 हजार तास म्हणजेच 1562 दिवस रंगमंच्यावर आहेत. इतकी वर्ष स्वतःबद्दल कुतुहल जागरूक ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. पण प्रशांत दामले यांनी ही गोष्ट केली. मराठी माणूस हा नाटक वेडा आहे. परंतु, आपल्याकडे कलाकारांचा आदर केला जात नाही, अशी खंत यावेळी राज ठाकरे यांनी बोलून दाखलवली.
बाहेरच्या देशांमध्ये विमानतळाला देखील कलाकारांची नावं दिली जातात. परंतु, आपल्याकडे फक्त सभागृहांना आणि चौकांना कलाकारांची आवं असतात. आपकल्याकडे कलाकारांची कदर केली जात नाही. 'आज मोठ्या कलाकारांचे सत्कार करण्यासाठी मोठी लोकंच उरलेली नाहीत म्हणून आम्हाला बोलावलं जातं,अशी खंत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
राज ठाकरेंची फटकेबाजी
राज ठाकरे यांनी यावेळी जोरदार फटकेबाजी केली. सत्कार करताना घंटा भेट दिल्याबद्दल राज ठाकरे यांनी मिश्किल टिप्पणी केली. "लोक निवडणुकीनंतर जे बोलतात ते अम्हीही बोलणार. आमच्या हाती काय आली ती घंटा." राज ठाकरे यांच्या या टिप्पणीवर सभागृहात एकच हाशा पिकला.
महत्वाच्या बातम्या