सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सांगलीत बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश मग आपला क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत लोकसंख्येमध्ये आपल्याला जमलं नाही चीन पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन मारेकरी पण हिंदू ना मेंदू असतो. यात आपला क्रमांक एक आहे, तो म्हणजे निर्लज्ज पणात. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात राहण्याचा बेशरमपणाचा हा देश आहे. लाज वाटत नाही. निर्लज्ज लोकांचं देश म्हणजे हिंदुस्थान आहे असे संभाजी भिडे म्हणालेत.
दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे राज्यकर्ते बेशरम
संभाजी भिडे म्हणाले की, दारुची दुकाने उघडी ठेवायला सांगणारे आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे राज्यकर्ते बेशरम, नालायक आहेत. जसे प्रभू रामचंद्र विवेक हरवून सोन्याच्या हरणाच्या मागे गेले आणि सीतेचे अपहरण झाले तसे राज्यकर्त्यांचा विवेक हरवलाय. शिवाजी-संभाजी महाराजांची अंतकरणात वस्ती असती तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करणारे राज्यकर्ते झाले असते.
दसऱ्यानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कडून काढल्या जाणाऱ्या दुर्गामाता दौडीस परवानगी न दिल्याच्या विषयावरुन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे राज्यकर्त्यांवर आणि महाविकास आघाडीवर चांगलेच भडकलेत. प्रभू रामचंद्रना जसे सोन्याच्या हरणाची भुरळ पडली आणि राम आपला विवेक हरवून बसले आणि त्या सोन्याच्या हरणाची शिकार करायला गेले, पुढे सीतेचे अपहरण झाले तसे आताच्या राज्यकर्त्यांच्या अकला, बुद्धी,मेंदू विकारवश झालेत, त्यामुळेच तर दुर्गामाता दौड करण्यास आम्हाला परवानगी दिली नाही. पण हेच राज्यकर्ते लॉकडाऊन झाल्यानंतर 21 व्या दिवशी महसूल वाढतो म्हणून राज्यभरातील दारूची दुकाने उघडी ठेवा म्हणून सांगतात आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालतात ते राज्यकर्ते बेशरम, नालायक आहेत अशा शब्दांत भिडेनी सरकारवर टीका केलीय. दसऱ्यानिमित्त साध्या पध्दतीने आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीच्या समारोप प्रसंगी बोलताना संभाजी भिडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.
कोरोना म्हणजे चीनने तुम्हा-आम्हाला पालथे पाडण्यासाठी केलेली बदमाशी
भिडे यांनी पुन्हा एकदा कोरोनावर बोलताना चीनवर टीकेची झोड उठवली. कोरोना म्हणजे चीनने तुम्हा-आम्हाला पालथे पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. कोरोना हा काल्पनिक, ना स्त्री ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसांना होणार रोग आहे. कोरोना थोतांड आहे असे भिडे म्हणाले.