Samata Party on Shivsena Symbol : उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर समता पार्टीने आक्षेप घेत हे चिन्ह आपलं असल्याचा दावा केला आहे. याबाबत समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दिली आहे. 2014 आणि 2019 मध्ये बिहार ग्रामपंचायतमध्ये आम्ही कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवली? असा प्रश्न देखील त्यांनी निवडणूक आयोगासमोर उपस्थित केला. तसेच आज समता पक्ष प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी मशाल या चिन्हावरून सुरू असलेल्या वादामुळे समता पार्टीच्या कार्यकर्त्यात व उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवत पोलिसांनी सुरक्षा पुरवावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. 


शिवसेनेत बंड झाले, लढाई कोर्टात गेली..अखेर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला चिन्ह दिलं. उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह देण्यात आलं. अन् गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या गट तट पक्ष चिन्ह या गोष्टींना तूर्तास पूर्णविराम मिळाला. मात्र त्यानंतर समता पार्टीने मशाल हे चिन्ह आमचं असल्याचा दावा केला आणि पुन्हा ठाकरे गटासमोर अडचण निर्णय झाली. समता पार्टीकडून हरकत घेत 1994 पासून राष्ट्रीयीकृत मशाल हे  चिन्ह आमचे आहे असा दावा करण्यात आलाय. हे चिन्ह ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकी करता  देण्यात आले आहे. यावर हरकत घेत समता पार्टी  यांनी  निवडणूक आयोगाकडे हे चिन्ह आमचं असल्याचा दावा करत ते पुन्हा आम्हाला मिळावे असे ईमेल द्वारे कळवले आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून 2004 पासून समता पक्षाने निवडणूक लढवले नसल्याने हे चिन्ह दिले असल्याची माहिती समता पक्षाच्या अध्यक्षांना दिली आहे. 


याबाबत समता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी  2014 ला आणि 2021 मध्ये बिहार ग्रामपंचायतमध्ये आम्ही कुठलं चिन्हावरती निवडणूक लढवली? असा सवाल निवडणूक आयोगाला केला आहे. आम्ही 2014 मध्ये मशाल या चिन्हावर निवडणुका लढवल्या, त्या सुद्धा बिहारमध्ये. आता आम्ही  2021 , 2022मध्ये जे ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवल्या त्या सुद्धा मशाल चिन्हावर लढवल्या. निवडणूक आयोगाचे महाराष्ट्रातलं ऑफिस आहे हा इशू त्यांचा आहे, दिल्ली कमिशनमध्ये आता जो काही निर्णय होईल त्यावर आम्ही पुढचं पाऊल उचलू. धनुष्यबाण गेल्यानंतर शिवसेनेला जसे दुःख झाले असे दुःख आम्हाला होत आहे. त्याचबरोबर मशाल या चिन्हावरून सुरू असलेल्या वादामुळे समता पार्टीच्या कार्यकर्त्यात व उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता वर्तवत प्रदेशाध्यक्षांनी पोलिसांकडून सुरक्षा मागितली आहे.