Samarjeetsinh Ghatge: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना आव्हान देण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कागल विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी फुंकली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना निसटत्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर अज्ञातवासात असलेल्या समरजित यांनी पुन्हा एकदा घरवापसीची तयारी केली आहे का? अशी चर्चा रंगली आहे. समरजीतसिंह घाटगे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही भेट घरवापसीसाठी आहे की अन्य वैयक्तिक कामांसाठी होती याबाबत स्पष्टता आलेली नाही.
मी अजूनही राष्ट्रवादीमध्येच
दरम्यान, एबीपी माझाने फोनवरून संपर्क साधला असता समरजित यांनी आपण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्येच असल्याचे म्हटले आहे. कागलच्या राजकारणामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ महायुतीचा भाग आहेत. माजी आमदार संजूबाबा घाटगे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे घाटगे यांची राजकीय कोंडी कागल तालुक्यामध्ये झाली आहे.
कागलच्या राजकारणात ट्विस्ट
समरजित घाटगे यांच्याकडून राजकीय चाचपणीची चर्चा होत असली, महायुतीचा भाग झाल्यास त्यांना मुश्रीफ आणि संजू बाबा घाटगे गटासोबत स्थानिक पातळीवर तडजोड करावी लागणार आहे. मात्र कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणार का? असाही प्रश्न आहे. कागलच्या राजकारणात गटातटाच्या राजकारण पाहता हे सुद्धा आव्हान असेल. कागलच्या राजकारणातील तिरंगी लढत नेहमीच मुश्रीफांच्या पथ्यावर पडली आहे. संजू बाबा घाटगे गटाची 40 ते 50 हजार मते मुश्रीफांच्या विजयात नेहमीच निर्णायक राहिली आहेत. अजित पवार गट भाजपसोबत असल्याने घाटगे आणि मुश्रीफ महायुतीचा भाग आहेत. त्यामुळे समरजित यांना नव्या राजकीय वाटचालीचा विचार करताना या समीकरणांचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. दुसरीकडे, समरजित घाटगे यांचे पक्षांतर करूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सुद्धा समरजित यांचे जवळचे संबंध आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या