यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आज आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा साहित्य विश्वात खळबळ उडाली आहे. पण साहित्य संमेलन होईपर्यंत यावर निर्णय होणार नाही, अशी माहिती मिळत आहे. उद्याच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल.


ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेलं मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचं निमंत्रण आयोजकांनी रद्द केलं होत. त्यामुळे साहित्य क्षेत्रात मोठा गदारोळ माजला होता. आयोजकांकडून सुरक्षेच्या कारणावरून निमंत्रण रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होत. त्यामुळे साहित्यिकांसह अनेक क्षेत्रातल्या लोकांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला आहे.

या वादानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आज महामंडळ उपाध्यक्ष विद्या देवधर यांना ई-मेलने राजीनामा पाठवला. मात्र साहित्य संमेलन होईपर्यंत राजीनाम्यावर निर्णय होणार नाही, अशी माहिती मिळत आहे. उद्या यासंबंधी बैठक होणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय होईल.

येत्या 11 जानेवारीपासून यवतमाळ येथे 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संमेलनाची सुरुवात वादाने झाली आहे. नयनतारा सहगल यांना आमंत्रण देऊन नंतर रद्द केल्यामळे अनेक मान्यवरांनी साहित्य संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच महामंडळाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी होत होती.

विशेष म्हणजे श्रीपाद जोशी यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ पुढील 3 महिन्यात संपणार होता. अशात साहित्य संमेलन सुरू होण्यापूर्वी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष यांनी राजीनामा दिला आहे.

काय आहे वाद?

यवतमाळमध्ये 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 11 जानेवारी पासून सूरु होत आहे. या संमेलनाला उद्घाटक म्हणून इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना आयोजन समितीकडून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांच्या नावाला काही संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. मराठी साहित्य संमेलनामध्ये इंग्रजी लेखिका कशा, असे म्हणून संमेलन उधळून लावू अशी भाषा केली होती. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या सांगण्यावरून यवतमाळ आयोजन समितीने नयनतारा सहगल यांना पाठविलेले निमंत्रण रद्द केले होते. त्यानंतर सर्व साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि विविध स्तरातून निमंत्रण रद्द केल्याबद्दल टीका करण्याात आली होती. आता त्यानंतर या संमेलनाच्या नव्या उद्घाटकाचे नाव सुचविण्यात यावे, असे महामंडळाने आयोजन समितीला सांगितले होते. यवतमाळ आयोजन समितीने काल साहित्य महामंडळाला उद्घाटक म्हणून चार व्यक्तींची नावं सुचवली होती.