सांगली : कोरोनामुळे नोकरी गेलेल्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठ नोकरीचा आधार देणार आहे. एबीपी माझाने नवनाथ गोरे यांची मांडलेली व्यथा पाहून कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी गोरेंना नोकरी देण्याचं आश्वासन एबीपी माझाशी बोलताना दिलं आहे. तसंच फोनवरून विश्वजित कदम यांनी गोरेंशी चर्चा केली असून यावेळी विश्वजित कदम यांनी नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठामध्ये नोकरीचा प्रस्ताव दिला आहे.


एबीपी माझाने कोरोनामुळे नोकरी गेल्याने गावी शेतात रोजंदारीवर काम करण्याची वेळ नवनाथ गोरेंवर आल्याची व्यथा मांडली होती. ही बातमी पाहून गोरे यांना अनेकांकडून मदतीबाबत फोन येत आहेत. भारती विद्यापीठकडून मात्र गोरे यांना नोकरीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठ उभारताना अनेक गोरगरीब, वंचित घटकांना यात सामावून घेतले. आजही हे विद्यापीठ पतंगराव कदम यांच्या विचारावर चालत असून नवनाथ गोरे यांना देखील भारती विद्यापीठ मध्ये आम्ही हक्काची नोकरी देऊच, शिवाय गोरेंचे लिखाण सुरूच राहावं यासाठी आम्ही त्याना प्रेरित करू असे भारती विद्यापीठाचे कार्यवाहक आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे.


नवनाथ गोरेंच्या 'फेसाटी' या पहिल्याच कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला होता. आपल्या वाट्याला आलेले दारिद्र्य आणि हलाखीची परिस्थिती याचे वर्णन गोरे यांनी या कादंबरी मांडले होते. यानंतर गोरे याना एका नामांकित शिक्षण संस्थेत नोकरी मिळाली. सर्व काही सुरळीत होत असताना कोरोना आणि शाळा, कॉलेजला कुलूप लागले. शाळा, कॉलेज कधीपर्यत सुरू होतील याची शाश्वती वाटत नसल्याने गोरे गावाकडे आले आणि आपल्या शेतात काम करण्यापासून ते मोलमजुरी करण्याचा त्याचा पुन्हा संघर्ष सुरू झाला. गोरे यांची हीच व्यथा एबीपी माझाने मांडली होती.


VIDEO | एबीपी माझानं दाखवलेली बातमी