कोल्हापूर : शेतकरी संपाबाबत सदाभाऊ खोत यांनी घेतलेली भूमिका ही शेतकरी विरोधी असल्यामुळं, सदभाऊंच्या भूमिकेचं समर्थन स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार नाही. त्यांना राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत जाब विचारणार असल्याची, माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिलीय. ते कोल्हापुरात बोलत होते.


शेतकरी संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा देत, आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. पण दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेतल्याचं चित्र आहे.

राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेकडेही सदाभाऊ खोत यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे सदाभाऊंच्या या भूमिकेमुळे राजू शेट्टी आणि सदाभाऊ यांच्यातील दरी चांगलीच वाढली आहे.

दुसरीकडे सदाभाऊंच्या भूमिकेमुळे संघटनेतले इतर कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संघटनेच्या आगामी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सदाभाऊंना जाब विचारणार असल्याचं राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना उतरणार असून, हा बंद शांततेत पार पडण्याचं आवाहन शेट्टी यांनी केलं आहे.

तर दुसरीकडं मोदींनी स्वामिनाथन आयोगाचे आश्वासन पळाले नाही. त्यामुळे स्वामिनाथन आयोग लागू करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकणार आहोत. त्यासाठी शेतकरी संपला राष्ट्रीय स्वरुप देऊन 16 तारखेला राज्यातील आणि  देशातील महत्त्वाच्या नेत्यांची सभा दिल्लीत होणार असल्याचंही शेट्टी यांनी सांगितलं.