सांगली : राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीत घराणेशाही पाहायला मिळते आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुणी पुतण्याला, तर कुणी मुलाला राजकारणात लॉन्च करत आहे. सांगलीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्याला मुलाला उतरवलं आहे.


राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोतने वाळवा तालुक्यातील बागणी जिल्हा परिषद गटातून रयत विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरला. हा गट राष्ट्वादीचे नेते जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो.

सदाभाऊंच्या मुलाने थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंत पाटलांनाच आव्हान देत घेरण्याचा प्रयत्न केला आहे. वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीला रोखण्यासाठी सर्व पक्षांनी मोट बांधली होती. मात्र, यातून शिवसेना तरी बाहेर पडून स्वतःत्र लढणार आहे.

सदाभाऊंचा मुलगा असल्याचा अभिमान आहेच. मात्र, निवडणूक लढवताना सागर खोत म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं सागर खोत यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

“एमपीएससी, यूपीएससीच्या प्रश्नांसंबंधी आवाज उठवून माझ्या चळवळीच्या जीवनाला सुरुवात केली आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही, तर गरिबीतून वर आलोय”, असेही सागरने सांगितले.

पाहा व्हिडीओ :