मुंबई : “मी मंत्री झाल्यापासून अनेकांच्या मनात असूया निर्माण झाली आहे. म्हणून मगरीसारखे ते अश्रू ढाळत आहेत. मी ठरवलं आहे, कुठल्या दिशेने जायचं ते”, असे म्हणत पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांना टोला लगावला आहे.

“मी जीवनात अनेक वादळं पाहिली आहेत आणि अनेक वादळं भविष्यात येणार आहेत. ती पार करुन पुढे जाऊ. कोणीही सत्तेतून बाहेर पडू नये. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी इथं बसलोय. मिळून मिसळून काम करावं.”, असे म्हणत सदाभाऊंनी राजू शेट्टी यांना सुनावलं आहे.

आत्मक्लेश यात्रेवर सदाभाऊ काय म्हणाले?

“मी सरकारमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करतोय. मला राज्यताल्या शेतकऱ्यांनी उभं केलं आहे. मी काय अवतारी पुरुष नाही की अचानक प्रकट झालोय. मी लहानपणापासूनच चळवळीत आहे.”, असे सदाभाऊ म्हणाले. शिवाय, “कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असून, मी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकाऱ्यांशी संवाद साधणारा मंत्री आहे. पारावर, कट्ट्यावर, चौकात जनता बोलतेय त्या भाषेत त्यांचे प्रश्न मांडायला मी सरकारमध्ये आलोय.”, असे आत्मक्लेश यात्रेवर बोलताना सदाभाऊ म्हणाले.

शेतकरी संपावर सदाभाऊ खोत काय म्हणाले?

“उद्यापासून संपावर जाणाऱ्या विविध शेतकरी संघटना आणि नेत्यांशी सरकार चर्चा करत आहे. संवादाच्या माध्यमातून आम्ही यावर निश्चित तोडगा काढू”, असा विश्वास सदाभाऊंनी व्यक्त केला.

“पूर्वीचे लोक चर्चा करतच नव्हते. सत्तेच्या बळावर आंदोलनं मोडीत काढत होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात शेतकऱ्यांचे बळी गेले. शरद जोशींच्या आंदोलनात 36 शेतकरी बळी गेले. ऊस आंदोलनात 2, मावळला 4 शेतकऱ्यांचे बळी गेले. पण आम्हाला असं करायचं नाही.”, असेही सदाभाऊ म्हणाले.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : सदाभाऊ

“मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे की, शेतकरी संघटनेतील प्रतिनिधी आणि सरकारी प्रतिनिधी अशी एक संयुक्त समिती गठीत करुन शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत धोरण ठरवू. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. ही सत्ता शेतकऱ्यांनी मिळवून दिलेली आहे.”, असं आश्वासनही सदाभाऊंनी दिले.